त्याच्याकडे फक्त दोन तास होते आणि त्याला त्याच्या ‘डार्लिंग’ला भेटायचे होते...! प्रभासने पूर्ण केली चाहत्याची अंतिम इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 03:58 PM2021-04-18T15:58:06+5:302021-04-18T15:58:27+5:30
प्रभासला साऊथ इंडस्ट्रीत डार्लिंग म्हणून ओळखतात, ते याचमुळे. किस्सा वाचून तुम्हीही व्हाल भावूक
प्रभास (Prabhas) केवळ सुपरस्टार नाही तर एक संवेदनशील सुपरस्टार आहे. कदाचित त्याच्याइतका विनम्र आणि दयाळू सुपरस्टार आज कोणीही नाही. आता हेच बघा ना, एका फॅनने विनंती केली आणि प्रभास शूटींग सोडून त्या फॅनला भेटायला पोहोचला. हा फॅनही असा की, जो त्याच्या अखेरच्या घटका मोजत होता... ( prabhas rushed to hospital to meet fan who is cancer patient supposed to die ext 2 hour)
सुप्रसिद्ध बिझनेसमॅन वेम्पा कासी राजू यांनी अलीकडे एका मुलाखतीत ही घटना सांगितली. राजू हे प्रभासच्याच भीमावरम या गावचे आहेत. राजू यांनी ही घटना सांगितली आणि सगळेच पुन्हा एकदा प्रभासच्या प्रेमात पडले. तर प्रभासचा हा फॅन राजू यांचा नातेवाईक होता. 20 वर्षाचा हा मुलगा प्रभासचा मोठा चाहता होता आणि रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता.
कॅन्सरच्या लास्ट स्टेजवर असलेल्या या मुलाने प्रभासला भेटायची त्याची अंतिम इच्छा व्यक्त केली होती. प्रभासला ही गोष्ट कळली आणि वेळ न घालवता अगदी शूटींग अर्धवट सोडून तो आपल्या या फॅनला भेटायला रूग्णालयात पोहोचला. माहिती मिळताच, तासाभराच्या आत प्रभास आपल्या मृत्यूशी झुंज देत असलेल्या फॅनसमोर होता. प्रभास त्याला भेटला, प्रेमाने त्याच्या माथ्याचे चुंबन घेतले आणि तासभर त्याच्यासोबत मस्तपैकी गप्पाही मारल्या. तू माझी कधीही आठवण कर, मी जिथे कुठे असेन तिथून तुझ्या भेटीला येईल, असे वचन देऊनच तो बाहेर पडला.
राजू यांनी सांगितल्यानुसार, कॅन्सरशी लढत असलेल्या त्या मुलाकडे फक्त दोन तास असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. पण प्रभासला भेटल्यानंतर तो 10 दिवस जगला. प्रभासच्या तासाभराच्या भेटीने त्या मुलाला 10 दिवसांचे जीवनदान मिळाले.
कदाचित याचमुळे प्रभासला इंडस्ट्रीत डार्लिंग म्हणून ओळखले जाते.