प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता कोळीने उरकला साखरपुडा, बॉयफ्रेंड वृशांकसोबत थाटणार संसार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 12:11 PM2023-09-17T12:11:23+5:302023-09-17T12:12:17+5:30
प्राजक्ताने बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत साखरपूडा उरकला आहे.
तरुणाईची लाडकी मराठी मुलगी मोस्टली सेन म्हणजेच 'प्राजक्ता कोळी' च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राजक्ताने बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत साखरपूडा उरकला आहे. इंस्टाग्रामवर तिचा आणि वृशांकचा फोटो शेयर करत तिने चाहत्यांना ही बातमी दिली. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
“आजपासून वृशांक हा आता माझा एक्स बॉयफ्रेंड आहे” असं प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिलं. या फोटोंमध्ये प्राजक्ता आणि वृशांकच्या हातात रिंग दिसत आहे. दोघांचे रोमॅंटिक फोटो पाहून चाहते मात्र आनंदी झाले आहेत. प्राजक्ता आणि वृशांक हे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. वृशांक हा व्यवसायाने वकील आहे. दोघेही सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
मुंबई विद्यापीठातून मास मीडियामध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला प्राजक्ताने एक रेडिओ जॉकी म्हणून काम केलं. त्यानंतर तिने स्वतःचं मोस्टली सेन नावाने युट्यूब चॅनेल सुरू केलं. प्राजक्ताने आपल्या कॉन्टेंटची सुरुवात शॉर्ट स्किट्स (प्ले) पासून केली. मात्र, हळूहळू तिचे चॅनल वाढत गेले आणि तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंग आणि सेलिब्रिटींच्या मुलाखतीही सुरू केल्या. सध्या तिचे यूट्यूबवर 78 लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 79 लाख आहे. सोशल मीडियाच्या दुनियेत सुपरहिट झाल्यानंतर तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला आणि बॉलिवूडमध्येही पदार्पण केले.
प्राजक्ताने नेटफ्लिक्सची सीरिज मिसमॅच्ड आणि 'जुग जुग जिओ' या बॉलीवूड चित्रपटात काम केले. तर 'नीयत' चित्रपटात विद्या बालनसोबत स्क्रिन शेयर करताना दिसली होती. शिवाय, प्राजक्ताने फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30 मध्येही आपले स्थान बनवले आहे. 2017 मध्ये ओबामा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्यासाठी निमंत्रण मिळाले होते. एवढेच नाही तर आता प्राजक्ता लवकरच लेखिका म्हणून पदार्पण करणार आहे. तिचे 'टू गुड टू बी ट्रू' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.