Prakash Jha : स्टार्स मंडळी गुटखा विकतात अन् वेळ मिळाला की...., बॉलिवूड स्टार्सवर बरसले प्रकाश झा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 11:12 AM2022-09-13T11:12:29+5:302022-09-13T11:19:21+5:30
Prakash Jha : चांगली कथा नसेल तर सिनेमे बनवू नका. पण सिनेमाचं मातेरं करू नका, अशा शब्दांत बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक व अभिनेते प्रकाश झा यांनी बॉलिवूडचे कान टोचले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडकरांना फैलावर घेतलं आहे...
बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक व अभिनेते प्रकाश झा (Prakash Jha) यांनी काही दिवसांपूर्वी ‘लालसिंग चड्ढा’च्या निमित्ताने बॉलिवूडकरांवर निशाणा साधला होता. बॉलिवूडचे काही लोक बकवास सिनेमे बनवतात. चांगली कथा नसेल तर सिनेमे बनवू नका. पण सिनेमाचं मातेरं करू नका, अशा शब्दांत त्यांनी बॉलिवूडचे कान टोचले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडकरांना फैलावर घेतलं आहे. फिल्म स्टार्स पान-गुटखा विकतात आणि फुर्सत मिळाली उठून रिमेक बनवतात, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश झा यांना गेल्या काही महिन्यांत बॉक्स ऑफिसवर दणकून आपटलेल्या सिनेमांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यामागचं कारण त्यांना विचारण्यात आलं. यावर प्रकाश झा यांनी परखड उत्तर दिलं.
काय म्हणाले प्रकाश झा?
बड्या बड्या बॉलिवूड स्टार्सचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. हे स्टार्स आजकाल पान-गुटखा विकत आहेत आणि वेळ मिळाला की उठून वाटेल ते रिमेक नाहीतर बकवास सिनेमे बनवत आहेत. अशात त्यांचे सिनेमे फ्लॉप होत असतील तर नवल नाही. त्यांना मात्र चार-पाच सिनेमे फ्लॉप झालेत तरी फरक पडत नाही. चित्रपट केवळ स्टार्समुळे हिट होतात, असा सर्वांचा समज झाला आहे. मला याचंच आश्चर्य वाटतं. अगदी निर्माते आणि लेखक सुद्धा चित्रपट स्टार्समुळे हिट होतात, असं मानू लागले आहेत, हे तर माझ्यासाठी आणखी आश्चर्यकारक आहे. फिल्म इंडस्ट्रीला यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. स्टार्स मंडळींना हे समजायला हवं की, लोकांनी तुम्हाला स्टार बनवलं आहे. एकदिवस हेच लोक तुम्हाला जमिनीवर आपटतील, असं प्रकाश झा म्हणाले.
साऊथचे लोक नवनवे प्रयोग करत आहेत. दर्जेदार कथा लोकांसमोर आणत आहेत. बॉलिवूडचे लोक काय करत आहेत? ते फक्त रिमेक बनवण्यात मश्गुल आहेत, असंही प्रकाश झा म्हणाले.
याआधी प्रकाश झा यांनी बॉलिवूडला असंच फैलावर घेतलं होतं. आपली इंडस्ट्री आळशी व सुस्त झाली आहे. टॉपच्या स्टार्स मंडळींनी अॅक्टिंग बंद करायला हवी. आधी कथेवर लक्ष द्यायला हवे. उत्तम कथा, उत्तम दिग्दर्शक आणि दर्जेदार विषयांवर सिनेमे बनवायला हवेत, असं ते म्हणाले होते.