आधी खिल्ली उडवली आता वाहवा! ‘चांद्रयान ३’च्या यशानंतर प्रकाश राज यांची पोस्ट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 10:42 AM2023-08-24T10:42:25+5:302023-08-24T10:46:16+5:30
‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रकाश राज यांनी केलेली 'ती' पोस्ट व्हायरल
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज यांनी एका ट्वीटमधून इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवली होती. प्रकाश राज यांनी चहाची किटली घेतलेल्या एका माणसाचा फोटो शेअर करत केलेलं इस्त्रोबद्दल केलेलं ट्वीट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं नव्हतं. या ट्वीटमुळे त्यांना प्रचंड ट्रोलही करण्यात आलं होतं. एवढंच काय तर त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. आता इस्त्रोला चंद्रमोहिमेत यश मिळाल्यानंतर प्रकाश राज यांनी पुन्हा पोस्ट शेअर केली आहे.
इस्त्रोच्या चंद्रमोहिमेतील चांद्रयान ३ने बुधवारी(२३ ऑगस्ट) यशस्वीरित्या लँडिंग केलं. हा सगळ्याच भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. अनेक सेलिब्रिटींनी इस्त्रोच्या या मोहिमेचं कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या. चांद्रयान ३ची खिल्ली उडवणाऱ्या प्रकाश राज यांनीही चांद्रयान ३ने यशस्वी लँडिंग केल्यानंतर इस्त्रोचं कौतुक करणारी पोस्ट केली आहे. प्रकाश राज यांनी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये चंद्रावर भारताचा झेंडा दिसत आहे. “भारताचं स्वागत” असंही या फोटोत लिहिलं आहे.
‘चांद्रयान ३’ची खिल्ली उडवणं महागात पडलं, प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल
“भारतासाठी आणि मानवजातीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. इस्त्रो, चांद्रयान ३, विक्रम लँडर आणि या मोहिमेत योगदान दिलेल्या सगळ्यांचे आभार. विश्वातील रहस्य शोधण्यात आणि ते सेलिब्रेट करण्यासाठी याचं मार्गदर्शन होईल,” असं प्रकाश राज यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी पुन्हा प्रकाश राज यांना ट्रोल केलं आहे.
प्रकाश राज यांनी ट्वीटमधून इस्त्रोची खिल्ली उडवली का?
प्रकाश राज ट्वीटमध्ये चहाची किटली घेतलेल्या एका माणसाचा फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यांनी 'ब्रेकिंग न्यूज! हे बघा विक्रम लँडरने पाठवलेली चंद्राची पहिली झलक. वॉव!' असं म्हटलं होतं. प्रकाश राज यांच्या या ट्वीटमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं. या ट्वीटनंतर प्रकाश राज यांनी पुन्हा ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. हे ट्वीट ‘चांद्रयान ३’ची खिल्ली उडवणारं नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. तसंच, या ट्वीटमागील विनोदाचा संदर्भही त्यांनी सांगितला होता. “द्वेष फक्त द्वेष पाहतो. मी आर्मस्ट्राँगच्या काळातील विनोदाचा संदर्भ देत होतो. आमचा केरळ चहावाला साजरा करत होतो. ट्रोलर्संनी कोणता चहावाला पाहिला? जर तुम्हाला विनोद कळत नसेल तर तुम्हीच एक विनोद आहात”, असं ते म्हणाले होते.