Amitabh Bachchan पेक्षा जास्त मानधन घेणारा व्हिलन प्राण, त्यांच्या 'या' खास गोष्टी माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 11:49 AM2022-02-12T11:49:33+5:302022-02-12T11:55:29+5:30
Pran Birthday Special : 1942 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत म्हणजेच 1947 पर्यंत त्यांनी सुमारे 22 चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या.
बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेते प्राण(Pran) यांचे पूर्ण नाव प्राण किशन सिकंद होते. 1942 पासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या प्राण यांनी 350 हून अधिक चित्रपट केले आहेत. जिस देश में गंगा बहती है, उपकार, शहीद, पूरब और पश्चिम, राम और श्याम, जंजीर, डॉन आणि अमर अकबर अँथनी (Pran Movie)यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
अवघ्या पाच वर्षात 22 चित्रपटांमध्ये केलं काम
दिवंगत अभिनेते प्राण यांचा जन्म आजच्या दिवशी 1920 मध्ये जुन्या दिल्लीतील बल्लीमारन भागात एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी या अभिनेत्याने 1940 साली आलेल्या 'यमला जट्ट' या पंजाबी चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. 1942 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत म्हणजेच 1947 पर्यंत त्यांनी सुमारे 22 चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या.
पदार्पणापूर्वी हॉटेलमध्ये काम करायचे
बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ते घर चालवण्यासाठी मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथील हॉटेलमध्ये काम करायचे. आठ महिने त्यांचा संघर्ष सुरू होता. मग एके दिवशी पानाच्या दुकानात उभा असलेले प्राण पंजाबी चित्रपटांचे लेखक मोहम्मद वली यांच्या नजरेस पडला. प्राण यांना पाहताच त्यांनी यमला जट या आगामी चित्रपटासाठी त्यांची निवड केली. येथून प्राण यांचे नशीब चमकले. त्यांना एकामागून एक चित्रपट मिळू लागले. जंजीर या चित्रपटासाठी प्राण यांनी अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांचं नाव सुचवलं होतं.
सर्वाधिक मानधनाची सुरुवात झाली जंजीरपासून...
‘जंजीर’ प्रदर्शनासाठी सज्ज होता पण तेव्हा कोणताच डिस्ट्रीब्युटर चित्रपट विकत घ्यायला तयार नव्हता. अमिताभ बच्चन त्यावेळी नवखे असल्यामुळे त्यांच्या नावावर पैसे गुंतवायला कोणीही तयार होतं नव्हते.त्यावेळी दिग्दर्शकांनी चित्रपटात मुख्य अभिनेता प्राण साहेब असल्याचे सांगायला सुरुवात केली आणि डिस्ट्रीब्युटरने हा चित्रपट लगेच विकत घेतला. त्यानंतर निर्माते त्यांना मुख्य अभिनेत्यापेक्षाही जास्त मानधन देऊ लागले. रिपोर्ट्सनुसार ‘बिग बीं’नी ‘डॉन’ या चित्रपटासाठी अडीच लाख रुपये मानधन घेतले होते, तर स्क्रीन कमी भूमिका असलेल्या प्राण यांनी 5 लाख रुपये घेतले होते.