माझी सुंदर आई...! स्मिता पाटील यांच्या आठवणीत मुलाची भावूक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 02:41 PM2020-12-13T14:41:50+5:302020-12-13T14:43:44+5:30
उण्यापु-या वयाच्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेली अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या निधनाला आज 34 वर्षे पूर्ण झालीत.
उण्यापु-या वयाच्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेली अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या निधनाला आज 34 वर्षे पूर्ण झालीत. स्मिता यांनी 28 नोव्हेंबर 1986 रोजी मुलगा प्रतिकला जन्म दिला. प्रतिकच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच स्मिता यांचे निधन झाले होते. आज स्मितांच्या पुण्यतिथीला त्यांचा मुलगा प्रतिक बब्बरने आईसाठी एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
प्रतीक बब्बर लिहितो,
34 वर्षांपूर्वी याच दिवशी माझी आई आम्हाला सोडून निघून गेली. एवढ्या वर्षात मी माझ्या मनात आणि मेंदूत तिची प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. आता ती एक परिपूर्ण आई आहे.... एक परिपूर्ण महिला आहे आणि एक परिपूर्ण आदर्श आहे. प्रत्येक लहान मुलासाठी प्रेमळ. एक आई जिच्याबद्दल प्रत्येक लहान मुलं विचार करून तिच्यासारखे बनू इच्छितो. अशी आई जी तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही, नेहमी ती तुमच्यासोबत राहते. माझी आई दरवर्षी माझ्यासोबत तरूण होते आहे. आता ती 65 वर्षांची तरूणी आहे. माझ्या या मनामध्ये ती कायमच जिवंत राहील. माझी सुंदर आई माझ्यासाठी अनमोल आहे. ती माझ्यासाठी सुपर लेजेंड आहे...
प्रतीकने 2008 मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’, ‘दम मारो दम’, ‘एक दिवाना था’ या चित्रपटांत प्रतीक दिसला. पण या चित्रपटांना फार यश मिळू शकले नाही.
विस्कटले बालपण! आईच्या आठवणीने या अभिनेत्याला बनवले होते ड्रग्ज अॅडिक्ट!!
प्रेमासाठी अख्ख्या जगाशी लढली अन् अचानक शांत झाली... वाचा, स्मिताची लव्हस्टोरी!
2017 मध्ये प्रतीकने त्याच्या व्यसनाबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. मी ड्रग्जच्या अधीन गेलो होतो, असे त्याने सांगितले होते. मी माझ्याआयुष्यात बरीच उलथापालथ झालेली बघितली. फर्स्ट इयरला असताना मित्रांनी माझी ड्रग्जशी ओळख करून दिली आणि मी या गर्तेत सापडलो. अपयश आणि अभिनेत्री एमी जॅक्सनसोबतच्या ब्रेकअपमुळे मी हतबल झालो होतो. यातूनच मी ड्रग्जच्या आहारी गेलो. पण आता मी यातून पूर्णपणे बाहेर आलोय. आता माझा सर्व फोकस माझ्या कामावर असणार आहे, असे प्रतीकने सांगितले होते.