Preity Zinta's birthday : -अन् त्या एका घटनेनं प्रिती झिंटाचं आयुष्यच बदललं...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 08:00 AM2023-01-31T08:00:00+5:302023-01-31T08:00:02+5:30
Preity Zinta : गालावर सुंदर खळी आणि ओठांवर खट्याळ हसू असलेल्या प्रिती झिंटाचे अनेक चाहते आहेत. आज प्रितीचा वाढदिवस.
Preity Zinta's birthday : गालावर सुंदर खळी आणि ओठांवर खट्याळ हसू असलेल्या प्रिती झिंटाचे अनेक चाहते आहेत. आज (31 जानेवारी) प्रितीचा वाढदिवस. आताश: प्रिती बॉलिवूडमध्ये फार अॅक्टिव्ह नाही. पण तिचे चाहते कमी नाहीत. लहानपणीच प्रितीच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर प्रितीला अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. पण तिने हार मानली नाही.
३१ जानेवारी १९७५ ला हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये प्रितीचा जन्म झाला. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, प्रिती एक बास्केटबॉल खेळाडू होती. पण वयाच्या तेराव्या वर्षी प्रितीवर अचानक घराची सगळी जबाबदारी आली. ती १३ वर्षांची असताना तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. तिची आईदेखील जखमी झाली. दोन वर्षे आई बिछाण्यावर होती. या दोन वर्षांत प्रितीला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं.
मानसशास्त्रात एम ए केल्यानंतर प्रितीने मॉडेलिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अनेक जाहिरातींसाठी तिने मॉडल म्हणून काम केलं. मात्र लिरिल साबण आणि पर्क चॉकलेटच्या जाहिरातीने प्रिती सगळ्यांच्या डोळ्यात भरली. याचकाळात तिची निर्माते शेखर कपूर यांच्याशी भेट झाली. त्यांनी तिला चित्रपटात येण्याचा सल्ला दिला. सोबतच आपल्या अॅड एजन्सीची एक जाहिरातही ऑफर केली.
शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू ठरला. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला ब्रेक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. चित्रपटात ती फक्त २० मिनिटं दिसली. पण या २० मिनिटांत प्रितीने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली. यातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
प्रितीचे पर्सनल लाईफही बरेच चर्चेत राहिलं. नेस वाडियासोबतचे प्रितीचं रिलेशनशिप जगजाहिर होतं. ती आणि नेस वाडिया दोघेही जवळपास चार वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. पण पुढे हे रिलेशनशिप वेगळ्याच वळणावर गेलं. तिने वाडियावर शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. वाडियाने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर त्यांच्या नात्यामध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला.
आयपीएल टीम किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य क्रिकेटर युवराज सिंहसोबतही प्रितीचे नाव जोडलं गेलं. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ब्रेट ली याच्याशी देखील तिचे अफेअर असल्याची अफवाही ऐकायला मिळाली. २०१६ मध्ये प्रितीने यूएसमधील तिचा बॉयफ्रेंड जेने गुडइनफ यांच्यासोबत विवाह बंधनात अडकली. आज प्रिती फक्त बॉलिवूडच्या पार्ट्याना दिसते.