पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं 'छावा'चं कौतुक, विकी कौशल म्हणाला - "शब्दांच्या पलिकडचा सन्मान.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 18:13 IST2025-02-22T18:12:19+5:302025-02-22T18:13:01+5:30
Chhaava Movie : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट छावा १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं 'छावा'चं कौतुक, विकी कौशल म्हणाला - "शब्दांच्या पलिकडचा सन्मान.."
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट 'छावा' (Chhaava Movie) १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसांपासूनच दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात विकी कौशल(Vicky Kaushal)ने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna)ने महाराणी येसूबाई यांची भूमिका निभावली आहे. या चित्रपटाचे सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यांनी केलेली प्रशंसा ऐकल्यावर विकी कौशलने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या छावा चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. गोवा आणि मध्यप्रदेश सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप कौतुक केले आहे. त्यानंतर विकी कौशलने नरेंद्र मोदींचा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. विकी कौशलने लिहिले की, शब्दांच्या पलीकडे आदर! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.
मॅडॉक फिल्म्सने पंतप्रधानांचे मानले आभार
तसेच मॅडॉक फिल्म्सनेही पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. इंस्टाग्रामवर एका पोस्टसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एक ऐतिहासिक सन्मान! पंतप्रधान मोदींनी 'छावा'चे कौतुक करून छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याग आणि वारशाचा गौरव केल्याने हा मोठा अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण आपल्याला कृतज्ञतेने भरुन टाकतो. मॅडॉक फिल्म्स, दिनेश विजन, लक्ष्मण उतेकर, विकी कौशल आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या विशेष उल्लेखाने भारावून गेली आहे.
'छावा'च्या कौतुकात नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी नवी दिल्लीत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटाबाबत देशभरात सुरू असलेल्या चर्चेवर पंतप्रधान म्हणाले, 'सध्या सर्वत्र 'छावा'ची धूम आहे.' नरेंद्र मोदी म्हणाले, 'महाराष्ट्र आणि मुंबईने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांनाही नवी उंची दिली आहे. सध्या सगळीकडे छावाची धूम पाहायला मिळत आहे. शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीत संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय याच रूपाने होतो.