Flashback: सौंदर्याची खाण होती ही अभिनेत्री, निर्दयीपणे झाली होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 08:00 AM2020-02-17T08:00:00+5:302020-02-17T08:00:01+5:30
फिल्म इंडस्ट्रीत एकीकडे झगमगाट आहे तर याच झगमगाटात काही दु:खान्तिकाही दडलेल्या आहेत.
फिल्म इंडस्ट्रीत एकीकडे झगमगाट आहे तर याच झगमगाटात काही दु:खान्तिकाही दडलेल्या आहेत. एका रात्रीत स्टार झालेले आणि मग असेच एका रात्रीत रूपेरी पडद्यावरून गायब झालेले अनेक चेहरे बॉलिवूडमध्ये आहेत. यापैकी अनेक चेहरे काळाच्या ओघात जगातून निघून गेलेत. असाच एक चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रिया राजवंश हिचा.
मधुबालाइतकीच हिच्या सौंदर्याने लोक दिपून जायचे. सौंदर्याची खाण असलेल्या प्रिया राजवंशने काही मोजकेच सिनेमे केलेत. पण तिचा वेगळा आवाज आणि सौंदर्य यामुळे तिची प्रचंड चर्चा झाली. दिग्दर्शक चेतन आनंद तर तिच्यावर असे काही फिदा होते की, तिने आपल्याशिवाय अन्य कोणत्याच दिग्दर्शकासोबत काम करू नये, अशी त्यांची इच्छा होता.
प्रिया राजवंश चित्रपटांत कशी आली, ती कहाणीही परिकथेपेक्षा कमी नाही. 22 वर्षांची प्रिया लंडनमध्ये राहायची. एकदा एका फोटोग्राफरने तिचे फोटो काढलेत. कसे कुणास ठाऊक पण बॉलिवूडच्या एका प्रोड्यूसरला तिचे हे फोटो मिळाले. या प्रोड्यूसरचे नाव होते ठाकूर रणबीर सिंग. रणबीर सिंगला प्रियासोबत चित्रपट करणे जमले नाही. पण तो प्रियाला भेटला. इतकेच नाही तर त्यानेच प्रियाची सुपरस्टार देव आनंद यांचे मोठे बंधू आणि दिग्गज दिग्दर्शक चेतन आनंद यांच्याशी प्रियाची भेट घालून दिली.
चेतन आनंदला प्रिया भेटली आणि तिच्या आयुष्याने कलाटणी घेतली. चेतन आनंद ‘हकीकत’ नावाचा सिनेमा बनवत होते. या चित्रपटासाठी त्यांनी विशीतल्या प्रिया राजवंशची निवड केली.
याच चित्रपटाच्या सेटवर प्रिया व चेतन आनंद एकमेकांत गुंतले. विशीतली प्रिया सुद्धा चाळीशीतल्या चेतन आनंद यांच्यावर भाळली होती. असे म्हणतात की, प्रियाला अभिनय शिकवता शिकवता चेतन आनंद तिच्या प्रेमात पडले. ‘हकीकत’ रिलीज झाला आणि सुपरहिट झाला तशी प्रिया राजवंश प्रकाशझोतात आली.
पहिल्याच चित्रपटानंतर प्रियाच्या घराबाहेर निर्माता-दिग्दर्शकाच्या रांगा लागल्या. पण प्रियाने सगळ्यांना नकार दिला. कारण होते, चेतन आनंद. प्रियाने केवळ आपल्यासोबत काम करावे, अशी चेतन आनंद यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेखातर प्रियाने सगळ्यांना नकार दिला. पुढे प्रिया व चेतन आनंद लिव्ह इनमध्ये राहू लागले. तिने फक्त चेतन आनंद यांच्याच सिनेमात काम केले.
‘हकीकत’नंतर चेतन आनंद यांचा पुढचा सिनेमा येता येता 6 वर्षे उलटून गेलीत. पण प्रियाने तक्रार केली नाही. ‘हकीकत’नंतर सहा वर्षांनी आलेल्या चेतन आनंद यांच्या ‘हिर रांझा’मध्ये प्रिया झळकली. म्हणायला प्रिया 22 वर्षे इंडस्ट्रीत होती. पण या काळात तिने केवळ 6 सिनेमे केलेत. तेही चेतन आनंद यांच्या सोबत.
असे म्हणतात की, चेतन आनंद व प्रियाने गुपचूप लग्नही केले होते. पण या लग्नाला अधिकृत मान्यता मिळू शकली नाही. कारण चेतन आनंद यांची पहिली पत्नी त्यांना घटस्फोट द्यायला तयार नव्हती. याचदरम्यान चेतन आनंद यांचे निधन झाले आणि प्रिया एकाकी पडली. चेतन आनंद यांच्या मृत्यूनंतर प्रिया राजवंशच्या अडचणी वाढल्या. इतकी की, ज्या बंगल्यात ती राहत होती, त्या बंगल्याचे भाडे भरायलाही तिच्याजवळ पैसे नव्हते. चेतन आनंद यांनी आपल्या संपत्तीचा काही भाग तिच्या नावे केला होता. पण त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांना म्हणजे केतन आनंद व विवेक आनंद यांनी प्रियाला संपत्तीत कुठलाही वाटा देण्यास नकार दिला. प्रियासोबतचे त्यांचे वाद विकोपाला पोहोचलेत.
अशात एक दिवस प्रियाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला. ही आत्महत्या असावी असा सगळ्यांचा कयास होता. पण नंतर चेतन आनंद यांच्या मुलांनीच प्रियाची हत्या केल्याचा खुलासा झाला. याप्रकरणी दोन्ही मुलांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली गेली. वरच्या कोर्टात मात्र या शिक्षेला स्थगिती मिळाली.