आनंदाची बातमी! प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक, वाचा काय म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 18:12 IST2024-12-12T18:11:43+5:302024-12-12T18:12:45+5:30
बऱ्याच दिवसांपासून प्रियंकाच्या कमबॅकच्या बातम्या येत होत्या. आता प्रियांकाने बॉलिवूडमधील तिचं कमबॅक कन्फर्म केलं आहे.

आनंदाची बातमी! प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक, वाचा काय म्हणाली...
Priyanka Chopra Jonas Confirms Bollywood Comeback : प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. प्रियंका आपल्या शानदार अभिनयाप्रमाणेच फिटनेस, फिगर आणि सौंदर्यासाठीही ओळखली जाते. सध्या प्रियंका ही हॉलिवूडमध्ये काम करतेय. पण, चाहत्यांना तिला पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटात काम करताना पाहायचं आहे. यात आता 'देसी गर्ल'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खुद्द प्रियंकाने आपल्या बॉलिवूड कमबॅकबद्दल अपडेट दिलं आहे.
नुकतंच प्रियंका सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आयोजित 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिनं हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या कमबॅकबद्दल एक मोठे अपडेट दिलं. आगामी भारतीय चित्रपटाविषयी बोलताना प्रियंका म्हणाली, "मी कुठेही जाते, तिथे कामाच्या माध्यमातून मी माझी ओळख प्रस्थापित करते. ही सवय माझ्या संगोपनाचा एक भाग आहे. भारतीय चित्रपट नेहमीच माझ्या हृदयाचा भाग आहेत. ते माझ्यापासून कोणीही काढून शकत नाही. मी 2025 मध्ये एक हिंदी चित्रपट साइन करणार आहे. आपण सर्वांनी आपल्या शुभेच्छा पाठवा, जेणेकरून हे खरे होईल".
प्रियंका ही बॉलिवूडमध्ये शेवटची अभिनेता राजकुमार रावसोबत 2021 मध्ये रिलीज झालेल्या "व्हाइट टायगर' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट इंग्रजी भाषेत बनवला होता. तर प्रियांका 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या घटनेला आता तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि चाहते तिला खूप मिस करत आहेत. प्रियंका ही फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटातून कमबॅक करणार होती. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होत्या. पण, पुढे या सिनेमाचं अपडेट आलं नाही.
दरम्यान, प्रियंका अलिकडेच ती 'सिटाडेल' या स्पाय थ्रिरल सीरिज प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये प्रियंका हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडेन याच्यासोबत झळकली. या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसऱ्या सीझनचं शुटिंगदेखील सुरू झालं आहे. शिवाय, ती 'हेड्स ऑफ स्टेट' आणि 'द ब्लफ'मध्ये दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती याचे शूटिंग करत असून यासंबंधीच्या पोस्ट शेअर करत असते. आता ती तिच्या पुढच्या बॉलिवूड चित्रपटाची घोषणा कधी करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.