प्रियंका चोप्रा म्हणाली, इथे शूटींग करणेही कठीण; नेटक-यांनी केले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 10:21 AM2019-11-04T10:21:04+5:302019-11-04T10:22:00+5:30
Delhi Pollution : ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतेय. याचे कारण म्हणजे, दिल्लीच्या प्रदूषणावरची तिची प्रतिक्रिया.
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतेय. याचे कारण म्हणजे, दिल्लीच्या प्रदूषणावरची तिची प्रतिक्रिया. होय, देशाची राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. दिल्लीकरांचा श्वास गुदमरू लागला आहे. अशात प्रियंका चोप्राने दिल्लीतील वाढत्या प्रदुषणावर सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियंका सध्या दिल्लीत आहे आणि ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर तिने इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये प्रियंकाने चेह-यावर मास्क लावलेला दिसतोय. ‘चित्रपटाच्या शूटिंगचा दिवस आहे. सध्यातरी इथे शूटिंग करणे खूप कठिण आहे. अशा परिस्थितीत इथे राहण्याचा अनुभव कसा असेल याचा विचारही मी करू शकत नाही,’ असे प्रियंकाने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.
‘आमच्याकडे एअर प्युरिफायर आणि मास्क आहे. पण ज्यांच्याकडे राहायला घरही नाही, त्या लोकांसाठी प्रार्थना करा,’ असेही तिने लिहिले आहे.
खरे तर प्रियंकाने तिच्या पोस्टमधून वास्तव मांडले. पण नेटक-यांनी मात्र प्रियंकाची ही पोस्ट वाचल्यानंतर तिला ट्रोल करणे सुरु केले.
अनेकांनी तिला तिचा सिगारेट पितांनाच्या फोटोची आठवण करून दिली. गतवर्षी प्रियंकाचा सिगारेट पितांनाचा फोटो व्हायरल झाला होता. यावरून लोकांनी तिला लक्ष्य केले. अनेकांनी तिला सल्लाही दिला. बेघर असलेल्या लोकांसाठी प्रार्थना करण्यापेक्षा त्यांच्यासाठी काही ठोस कर, असे अनेकांनी तिला सुचवले.
दिल्ली-एनसीआर भागामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (ईपीसीए) जाहीर केले आहे. या भागामध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ईपीसीएने मनाई केली आहे. तसेच प्रदूषण आणि खराब हवामानामुळे दोन दिवस नोएडातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.