प्रसिद्ध अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडसाठी प्रियांकाला केलं होतं सिनेमातून आऊट; 'देसी गर्ल'ने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 05:23 PM2024-04-27T17:23:19+5:302024-04-27T17:33:43+5:30
Priyanka chopra: प्रियांकाला बॉलिवूडमध्ये अनेकदा नकार, अवहेलना, टोमणे, रिजेक्शन या सगळ्याचा सामना करावा लागला. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या रिजेक्शनविषयी एक मोठा खुलासा केला.
देसी गर्ले ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (priyanka chopra). उत्तम अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्री गाजवणाऱ्या प्रियांकाने हॉलिवूडमध्ये तिचा जम बसवला आहे. त्यामुळे तिचा पूर्वीपेक्षा आता बॉलिवूडमधील वावर कमी झाला आहे. परंतु, प्रियांकाने बॉलिवूडमध्ये जितक्या भूमिका केल्या त्या सगळ्याच गाजल्या. मात्र, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेकदा नकार, अवहेलना, टोमणे, रिजेक्शन या सगळ्याचा सामना तिला इंडस्ट्रीत करावा लागला. एका मुलाखतीमध्ये तिने एका सिनेमाविषयी मोठा खुलासा केला आहे.
अलिकडेच प्रियांकाने रिड द रुम या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एका सिनेमाचा अनुभव सांगितला. एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडसाठी तिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. असा खुलासा तिने या मुलाखतीमध्ये केला.
"हे फार कठीण असतं खासकरुन अशा नोकऱ्यांमध्ये जिथे तुमच्या कामाला मंजुरी मिळणं खूप गरजेचं असतं. तुमचा सिनेमा पाहण्यासाठी किती लोक येतात, तुमच्या दिग्दर्शकाला तुमच्या अभिनयाविषयी काय वाटतं किंवा कास्टिंग एजंट तुमच्याविषयी काय विचार करतो या सगळ्या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात. हे सगळं व्यक्तीनिष्ठ असतं", असं प्रियांका म्हणाली.
पुढे ती म्हणते, "फिल्म इंडस्ट्रीत मी खूप नकार पचवले आहेत ते सुद्धा अनेक कारणांसाठी. मग त्या भूमिकेसाठी मी योग्य नसेन किंवा मग पक्षपात असेल. इतकंच नाही तर मग एखाद्याच्या गर्लफ्रेंडला संधी द्यायची असेल. अशा कितीतरी कारणांसाठी मी नकार पचवले आहेत. पण, या सगळ्यातून आता मी बाहेर आले आहे. आपण सगळे म्हणतो की, मी त्याच्यापेक्षा चांगली आहे. माझ्यात आत्मविश्वास आहे पण हे सगळं खरं नसतं. तुम्हाला तो नकार फिल झाला पाहिजे."
दरम्यान, यापूर्वीही प्रियांकाने सिमी गरेवाल यांना मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्येही तिने तिच्या करीअरविषयी अनेक खुलासे केले होते. सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये कोणीही माझ्यासोबत काम करायला तयार नव्हतं, असं ती या मुलाखतीमध्ये म्हणाली होती.