प्रियांका चोप्राची बहीण अडकली लग्नाच्या बेडीत; मीरा चोप्राच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 08:45 AM2024-03-13T08:45:09+5:302024-03-13T08:45:31+5:30
मीराने १२ मार्चला रक्षित केजरीवालबरोबर सात फेरे घेतले. जयपूरमधील एका रिसोर्टमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
सध्या मनोरंजनविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहीच दिवसांपूर्वी जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंह यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. त्यानंतर अभिनेत्री सुरभी चंदनाही विवाहबंधनात अडकली. आता बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण मीरा चोप्रानेही लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मीराने १२ मार्चला रक्षित केजरीवालबरोबर सात फेरे घेतले. जयपूरमधील एका रिसोर्टमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
आयुष्यातील या खास क्षणासाठी मीराने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. तर रक्षित शेरवानीमध्ये राजबिंडा दिसत होता. मीरा चोप्राने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
चोप्रा सिस्टर्स सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत आहेत. प्रियांका चोप्राच्या पावलावर पाऊल ठेवत परिणीतीनेही अभिनयात करिअर करायचं ठरवलं. त्याबरोबरच मीरा चोप्रा आणि अलिकडेच बिग बॉसमध्ये दिसलेली मन्नारा चोप्राही बॉलिवूडमध्ये नाव कमवत आहेत. मीराने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडबरोबरच तिने साउथमध्येही तिचा ठसा उमटवला आहे. तमिळ सिनेमातून तिने अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर '१९२० लंडन', 'गँग ऑफ घोस्ट', 'सेक्शन ३७५' या सिनेमांमध्ये ती झळकली. मीरा अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सफेद' सिनेमात दिसली होती.