‘हॉटेल मुंबई’च्या निर्मात्यांनी लाँच केले ‘भारत सलाम’ गाणे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:00 PM2019-11-24T18:00:00+5:302019-11-24T18:00:07+5:30
२६/११ च्या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी हे गाणे बनवण्यात आले आहे. हे गाणे मिथुन यांनी तयार केले असून सुनिधी चौहान आणि बीप्राक यांनी त्यांचा आवाज या गाण्याला दिला आहे.
मुंबई हॉटेल या चित्रपटाला जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक खास गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आले आहे. २६/११ च्या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी हे गाणे बनवण्यात आले आहे. हे गाणे मिथुन यांनी तयार केले असून सुनिधी चौहान आणि बीप्राक यांनी त्यांचा आवाज या गाण्याला दिला आहे. भारतीयांच्या एकात्मतेचे आणि मानवतेचे चित्रण या गाण्याद्वारे करण्यात आले आहे. या गाण्यात मुख्य गायकांसोबतच इतर ४० गायकांचाही समावेश आहे.
गाण्याबाबत अधिक माहिती देताना मिथुन म्हणाले,‘जेव्हा चित्रपटाचे निर्माते मला या गाण्यासाठी भेटले तेव्हा निर्मात्यांची चित्रपटाबाबतची कल्पना स्पष्ट होती. त्यांना या गाण्यात केवळ ऊर्जाच हवी असे नसून त्यांना या गाण्यातून देशप्रेमाची उत्कट भावनाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. मी एक भारतीय असण्यासोबतच एक मुंबईकरही आहे. त्यामुळे मी लगेचच त्या भावनेने प्रेरित झालो. ते इतरांचा जीव वाचवण्यासाठी ते स्वत:च्या जीवाची बाजी देण्यासाठी तयार होतात. ‘भारत सलाम, यह एक सैल्यूट है’ हे गाणे शहीदांचे सन्मान करत आहे. शहीदांच्या साहस, धैर्याला सलाम या गाण्यातून करण्यात आला आहे.
हॉटेल मुंबई या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते झी स्टुडिओज आणि पर्पल एन्टरटेन्मेंट असून हा चित्रपट २९ नोव्हेंबर २०१९ ला इंग्रजी, हिंदी, तमीळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.