मोठा खुलासा! ४ लाखाची रायफल खरेदी केली अन् सलमान खानच्या हत्येचा कट फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 04:15 PM2022-06-06T16:15:39+5:302022-06-06T16:16:10+5:30
जेलमध्ये बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं २०२१ मध्ये सुरक्षा एजन्सीच्या चौकशीत सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली.
नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. ही पहिलीच घटना नाही जेव्हा सलमान खानला अशाप्रकारे धमकी मिळाली आहे. याआधीही जेलमध्ये बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खानला मारण्याची धमकी दिली होती. त्याने सलमानला मारण्याचा कटही रचला होता. परंतु अखेरच्या क्षणी तो डाव उधळला.
जेलमध्ये बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं २०२१ मध्ये सुरक्षा एजन्सीच्या चौकशीत सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. लॉरेन्सनं खुलासा केला की, त्याने सलमान खानला मारण्यासाठी राजस्थानच्या गँगस्टर संपत नेहराशी बोलला होता. त्यानंतर संपत नेहरा मुंबईत गेला. संपतने सलमानच्या घरची रेकी केली होती असं त्याने तपासात सांगितले.
हा डाव कसा उधळला?
लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीत समोर आले की, संपतकडे पिस्तुल होती. त्यामुळे तो लांबचा निशाणा मारू शकत नव्हता. जास्त दूरी असल्याने त्याला सलमान खानपर्यंत पोहचता आले नाही. त्यानंतर संपतने त्याच्या गावातील दिनेश फौजीच्या माध्यमातून RK स्प्रिंग रायफल मागवली. ही रायफल बिश्नोईने अनिल पांड्याकडून ३-४ लाखात खरेदी केली होती. परंतु रायफल दिनेशकडे होती तेव्हा तो पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर संपत नेहराही पोलिसांना सापडला.
सलमानला का मारायचं होतं?
काळवीट शिकार प्रकरणावरून लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खानला मारण्याची धमकी दिली. कारण लॉरेन्स बिश्नोई समाजातून होता. जेव्हा सलमानला या प्रकरणात आरोपी बनवलं तेव्हापासून तो त्याच्यावर नाराज होता. सलमानला जीवे मारण्यासाठी बिश्नोईनं प्लॅनिंगही केली. फिल्म रेडीच्या शूटींगवेळी लॉरेन्स सलमान खानवर हल्ला करणार होता. परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
जेलमधून गँगवार सक्रीय
लॉरेन्स बिश्नोई दिल्लीच्या तिहाड जेलमध्ये बंद आहे त्याठिकाणाहून तो गँग चालवतो. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुपारी घेणे आणि हत्या घडवणे आजही सुरू आहे. संपूर्ण देशात त्याचे नेटवर्क आहे. त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांची संख्या ७०० हून अधिक आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराड एकत्र काम करतात. सिद्धू मूसेवाला हत्याकांडात लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचा समोर आले आहे.
सलीम आणि सलमान खानला धमकीचं पत्र
लेखक सलीम खान हे रविवारी सकाळी आपल्या सुरक्षारक्षकासह वॉकसाठी वांद्रेच्या बॅन्डस्टॅन्ड प्रॉमीनेड येथे गेले होते. व्यायाम झाल्यानंतर ते नेहमीच्या ठिकाणी बेंचवर बसले. त्या बेंचवर त्यांचा सुरक्षारक्षक श्रीकांत हेगिष्टे यांना एक चिठ्ठी आढळली. यात ‘सलीम खान, सलमान खान बहुत जल्द आपका मुसेवाला होगा’, असे लिहून त्या धमकीखाली इंग्रजीमध्ये के.जी.बी.एल.बी असे लिहिले होते.