झुकेगा नहीं म्हणणारा ‘पुष्पा’ अखेर झुकलाच..; ट्राफिक पोलिसाने ठोठावला 700 रूपयांचा दंड...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 02:16 PM2022-04-06T14:16:27+5:302022-04-06T14:20:49+5:30
Pushpa Star Allu Arjun in Legal Trouble : ‘झुकेगा नहीं साला...’ म्हणणारा ‘पुष्पा’ अर्थात अल्लू अर्जुन आता एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे.
Pushpa Star Allu Arjun in Legal Trouble : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’नं (Pushpa ) देशभर किती धुमाकूळ घातला हे नव्यानं सागायला नको. चित्रपटातील अल्लूची युनिक स्टाईल लोकांना आवडली. तेवढेच त्याच्या तोंडचे डायलॉगही गाजलेत. फ्लावर नहीं फायर हूं मैं..., झुकेगा नहीं साला..., असे काही डायलॉग लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. तूर्तास ‘झुकेगा नहीं साला...’ म्हणणारा ‘पुष्पा’ अर्थात अल्लू अर्जुन (Allu Arjun) आता एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे.
होय, एका ट्राफिक हवालदारानं ‘झुकेगा नहीं ’ म्हणणाऱ्या ‘पुष्पा’ला अर्थात अल्लू अर्जुनला अखेर झुकवलंच. आता कसं ? तर त्यासाठी तुम्हाला पुढची बातमी वाचावी लागेल. तर रिअल लाईफमध्ये अल्लूनं एक नियम मोडला आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हैदराबाद ट्राफिक पोलिसांनी त्याची कार पकडली. पोलिसांनी अल्लू अर्जुनच्या रेंज रोवर कारचं चालान फाडलं आणि अभिनेत्याला 700 रूपये दंड भरावा लागला.
प्राप्त माहितीनुसार, हैदराबादच्या बिझी सेंटरजवळ ट्रॅफिक पोलिसांनी अल्लूची लक्झरी रेंज रोवर एसयूव्ही रोखली. अल्लू यावेळी कारमध्ये होता. अल्लूच्या गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गाडीच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास भारतात बंदी आहे. याऊपर अनेक सेलिब्रिटी अशा काचांवर गडद काळ्या फिल्म्स लावतात. पण सेलिब्रिटी असो की सामान्य नागरिक सर्वांसाठी नियम सारखेच. त्यानुसार, वाहतूक पोलिसांनी अल्लू अर्जुनवर कारवाई करत त्याला 700 रुपये दंड भरण्यास सांगितला.
यापूर्वी तेलुगू दिग्दर्शक त्रिव्रम श्रीनिवास, कल्याण राम, ज्युनिअर एनटीआर आणि मनचू मानो यांनी गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे दंड भरला होता. त्यानंतर आता अल्लू अर्जुनने देखील दंड भरला आहे.
गेल्यावर्षी 17 डिसेंबरला अल्लूचा ‘पुष्पा’ हा सिनेमा रिलीज झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. अद्यापही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. लवकरच याचा दुसरा भाग ‘पुष्पा -2’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.