‘क्वीन’ कंगना राणौतचा शबाना आझमी यांच्यावर आरोप; नवज्योत सिंग सिद्धू यांनाही धरले धारेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:54 PM2019-02-16T12:54:45+5:302019-02-16T12:54:53+5:30
विविध स्तरांतून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. कलाविश्वातूनही यावर अनेक कलाकारांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जगभरातून संतापाची लाट उसळली आहे. कंगना राणौतनेही तिचा संताप व्यक्त करत शबाना आझमींवरही देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे.
जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे अलीकडेच दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४५ जवानांना वीरमरण आले आहे. पाकिस्तानातील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. विविध स्तरांतून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. कलाविश्वातूनही यावर अनेक कलाकारांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जगभरातून संतापाची लाट उसळली आहे. कंगना राणौतनेही तिचा संताप व्यक्त करत शबाना आझमींवरही देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. तसेच नवज्योत सिंग सिद्धू यांनाही धारेवर धरले आहे.
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी हे देशद्रोही असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी पाकिस्तानच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले आहे. मात्र, त्यानंतरही कंगनाकडून त्यांच्यावर टोकाची टीका करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्याबाबत बोलत असताना कंगना म्हणाली की,‘जावेद अख्तर आणि शबाना आझमी हे पाकिस्तानशी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आदानप्रदान करतात. हे तेच लोक आहेत, जे 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणाऱ्यांचे समर्थन करतात. 'उरी' हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही, यांना पाकिस्तानमध्ये जाऊन कार्यक्रम करण्याची काय गरज आहे? असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार हे देशद्रोही असल्याचा अजब दावा तिने केला आहे.
कंगनाने पुढे नवज्योत सिंग सिद्धू यांनाही धारेवर धरले. ‘पाकिस्तानसोबत संबध सुधारण्यासाठी हिंसा नव्हे, तर संवाद हवा’, असे सिद्धू यांनी वक्तव्य केले होते. त्यांचे नाव न घेता कंगनाने त्यांचा समाचार घेतला आहे, ‘जवानांवर हल्ला केला जात आहे आणि काही लोक हिंसा, अहिंसा आणि शांतीच्या गोष्टी करत आहेत, अशा लोकांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढायला हवी,’ असे मत कंगनाने व्यक्त केले आहे. पाकिस्तान हा फक्त आपल्या देशावरच नाही, तर आपल्या सहनशक्तीवरही वार करत आहे. त्याला धडा शिकवायलाच हवा, असेही कंगना म्हणाली.