सही रे! फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी माधवनसोबत घेतला सेल्फी, पंतप्रधान मोदींनीही दिली पोज; Video
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 11:25 AM2023-07-16T11:25:37+5:302023-07-16T11:36:42+5:30
माधवनची ही पोस्ट पाहून चाहत्यांना त्याचा अभिमान वाटतोय.
'रहना है तेरे दिल मे' फेम अभिनेता आर माधवन (R Madhavan) एका सेल्फीमुळे चर्चेत आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्याने हा फोटो शेअर केला आहे. माधवनने काही तासांपूर्वीच एक लांबलचक पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबतचे काही फोटो, व्हिडिओ पोस्ट केले आहेत. माधवनची ही पोस्ट पाहून चाहत्यांना त्याचा अभिमान वाटतोय.
नरेंद्र मोदींच्या फ्रान्स दौऱ्यावेळी त्यांच्या सम्मानासाठी Luvre Museum येथे डिनरचे आयोजन केले होते. याठिकाणी माधवनही सहभागी झाला होता. पहिल्याच फोटोत माधवन नरेंद्र मोदींसोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे. मोदींच्या बाजूलाच इमॅन्युएल मॅक्रॉन बसले होते. तर पुढच्या फोटोत तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार प्राप्त संगीतकार रिकी केजही दिसत आहेत. या इव्हेंटमध्ये सहभागी होणं माधवनसाठी खास होतं. त्याने हिरव्या रंगाचा शर्ट, ग्रे रंगाचा सूट आणि परिधान केला होता.
सेल्फीसाठी दिली पोज
माधवनने एक व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे. यामध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती स्वत: उठून मोबाईल मागवतात आणि सेल्फी घेतात. सर्वांनीच फोटोसाठी पोज दिली. माधवनने लिहिले,'१४ जुलै २०२३ रोजी पॅरिसमधील बैस्टिल डे सेलिब्रेशनवेळी भारत फ्रान्स संबंधांसोबतच देशासाठी काहीतरी चांगलं करण्याची जिद्द स्पष्ट दिसत होती. मी तर यावेळी स्तब्ध झालो होतो. त्या हवेत सकारात्मकता होती आणि एकमेकांसाठी आदर होता.मी प्रामाणिकपणे सांगतो की त्यांचं ध्येय हे सर्वांना योग्य वेळी फळ देईल. राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी यावेळी आमच्यासाठी सेल्फीही काढला. हा क्षण माझ्या मनात नेहमीसाठी कोरला गेला आहे.
माधवनच्या या पोस्टवर सर्वांनीच त्याचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही कमेंट करत लिहिले, 'तू मिळवलेल्या यशाचा मला खूप अभिमान वाटतो मित्रा. तू यासाठी पात्र आहेस. तर अनुपम खेर यांनी लिहिले, 'जय हो जय हिंद'. इतर चाहत्यांनीही माधवनचे तोंड भरुन कौतुक केले आहे.