ये रोल तो मेरा कुत्ता भी...! राजकुमार यांनी आधी वेलकम वगैरे केलं आणि मग असा पाणउतारा केला...!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 08:00 AM2021-10-08T08:00:00+5:302021-10-08T10:40:16+5:30
Raaj Kumar 95th birth anniversary: राजकुमार एक वेगळंच रसायन होतं. त्यांच्या अॅटिट्यूडचे किस्से ऐकताना आजही अनेकजण थक्क होतात...
जानी... हा शब्द ऐकताच आजही एकच चेहरा डोळ्यांपुढे येतो... तो म्हणजे राजकुमार (Raaj Kumar) यांचा. सुटाबुटात आणि मोठ्या रुबाबात हातातला पाईप सावरत पडद्यावर त्यांची एन्ट्री व्हायची आणि त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडायच्या. टाळ्या आणि शिट्ट्यांनी अख्खं थिएटर दणाणून जायचं. आज राजकुमार आपल्यात नाहीत. आज त्यांचा वाढदिवस (Raaj Kumar Birthday).
पडद्यावर राजकुमार यांचा वेगळाच रूबाब होता. ख-या आयुष्यातही त्यांचा तेवढाच रूबाब होता. त्यांच्या अॅटिट्यूडचे चिक्कार किस्से ऐकताना आजही अनेकजण थक्क होतात. ‘बरखुरदार, अपने बाप से पूढना कौन हूं मैं...,’ असं सलमानला सुनावणारे, नाना पाटेकरांना ‘जाहिल’ म्हणणारे आणि मेरे लिए चाहे राजेंद्र कुमार हो, जीतेंद्र हो धर्मेन्द्र हो या फिर कोई बंदर हो, क्या फर्क पडता है. जानी के लिए सब बराबर है, म्हणत धर्मेन्द्र यांना डिवचणारे राजकुमार एक वेगळंच रसायन होतं. एकदा रामानंद सागर यांनाही राजकुमार यांनी असाच अपमान केला होता...
काय होता तो किस्सा...
तर एकदा दिग्दर्शक-निर्माते रामानंद सागर एका चित्रपटाची ऑफर घेऊन राज कुमार यांच्या घरी गेले होते. खरं तर दोघांमध्ये चांगली मैत्री होती. जिंदगी व पैगाम यासारखे सिनेमे दोघांनी एकत्र केले होते. आपल्या नव्या चित्रपटातही राज कुमार यांना घेण्याची रामानंद यांची इच्छा होती. चित्रपट होता आँखे. या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन एकदिवस रामानंद सागर राज कुमार यांच्या घरी गेलेत. राज कुमार नेहमीच्या एैटीत बसलेले होते. आधी आवभगत झाली आणि ठरल्याप्रमाणे रामानंद सागर यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट राज कुमार यांच्याकडे दिली. मानधन म्हणून दहा लाख देण्याची तयारीही दर्शवली. पण राजकुमार यांना स्क्रिप्ट आवडली नाही. अशावेळी स्पष्ट नकार दिल्या गेला असता. पण राज कुमार मूडी माणूस. त्यानं काय केलं तर आपल्या पाळीव कुत्र्याला हाक मारली.
कुत्रा लगेच शेपूट हलवत राज कुमार यांच्या पुढ्यात येऊन उभा झाला. यानंतर तर राज कुमार यांनी कमालच केली. ‘रामानंदजी नयी फिल्म लेकर आयें है, क्या राय है, फिल्म करे,’ असं कुत्र्याकडे पाहून ते म्हणाले. तो मुका प्राणी बिचारा काय बोलणार, तो गप्पगुमानं आलं आणि राज कुमार यांच्या पायाशी जावून बसलं. ते पाहून, ‘देखा,ये रोल तो मेरा कुत्ता भी नहीं करना चाहेगा. ऐसें में हां करने का सवाल ही नहीं उठता,’ असं राजकुमार म्हणाले.
रामानंद सागर यावर काहीही बोलले नाहीत. ते उठले आणि तडक बाहेर पडले. पण हा अपमान ते कधीच विसरू शकले नाहीत. पुढे त्यांनी कधीच राज कुमार यांचं तोंडही पाहिलं नाही. धर्मेन्द्रला घेऊन रामानंद सागर यांनी आँखे हा सिनेमा बनवला. सिनेमा तो तुफान हिट झाला. पण संबंध बिघडले ते बिघडलेच...