लोकगायिका सुषमा नेकपूरची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 10:21 AM2019-10-03T10:21:51+5:302019-10-03T10:23:30+5:30
यापूर्वी 19 ऑगस्टला एका गावात गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली असता सुषमावर जीवघेणा हल्ला झाला होता.
ग्रेटर नोएडाच्या मित्रा सोसायटीनजिक दोन अज्ञात बाईकस्वारांनी लोकगायिका सुषमा नेकपूर हिची गोळ्या झाडून हत्या केली. मंगळवारी रात्री ही घटना घडली. मारेक-यांनी सुषमावर एकापाठोपाठ एक अशा चार गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सुषमाचा जागीच मृत्यू झाला.
बुलन्दशहरच्या जहांगीपूर ठाण्याअंतर्गत येणा-या नेकपूर या गावात राहणारी सुषमा रागिनी गायिका होती. सध्या ती मित्रा सोसायटीत राहत होती. मंगळवारी साडे आठच्या सुमारास ग्रेटर नोएडाला परतत असताना तिच्यावर हा हल्ला झाला. मित्रा सोसायटीत गाडीतून उतरत असतानाच दोन बाईकस्वारांनी तिच्यावर अंधाधून गोळीबार केला. सुषमा जागीच कोसळली. तिला त्वरित रूग्णालयात भरती करण्यात आले. पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
यापूर्वी 19 ऑगस्टलाही एका गावात गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली असता तिच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.
लिव्ह इनमध्ये राहत होती सुषमा
सुषमाचा चार वर्षांपूर्वी पतीसोबत घटस्फोट झाला होता. सध्या ती गजेंद्र भाटी नामक व्यक्तिसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. गायिकेचा तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीसोबत वाद सुरु होता. घटस्फोट झाल्यानंतरही तो सुषमाचा पिच्छा पुरवत होता. सुषमाने पोलिसांत याबद्दलची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात जमिनीवरूनही एका व्यक्तिशी तिचा वाद सुरू होता.