Raj Babbar Birthday Special : अशी सुरू झाली होती राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची प्रेमकथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 13:49 IST2021-06-23T13:45:19+5:302021-06-23T13:49:19+5:30
स्मिता पाटील आणि राज बब्बर यांची प्रेमकथा अतिशय रंजक आहे. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांची स्मिता पाटील यांच्यासोबत कशी ओळख झाली याविषयी सांगितले होते.

Raj Babbar Birthday Special : अशी सुरू झाली होती राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची प्रेमकथा
राज बब्बर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्यासोबतच एक राजकारणी अशी देखील त्यांची ओळख आहे. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांची प्रेमकथा अतिशय रंजक आहे. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांची स्मिता पाटील यांच्यासोबत कशी ओळख झाली याविषयी सांगितले होते.
राज यांनी सांगितले होते की, भीगी पलके या चित्रपटाच्या सेटवर १८८२ मध्ये माझी स्मितासोबत ओळख झाली. चित्रपटाचे चित्रीकरण ओडिसामध्ये झाले होते. स्मिताचे बोलणे मला खूप आवडायचे. बहुधा मी त्याचमुळे तिच्या प्रेमात पडलो. पहिल्याच भेटीत ती मला आवडायला लागली होती.
स्मिता पाटील यांना देखील राज बब्बर प्रचंड आवडू लागले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्यासाठी लग्न करणे सोपे नव्हते. कारण राज बब्बर यांचे पहिले लग्न झालेले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नादिरा बब्बर असून त्या देखील अभिनेत्री आहेत. स्मिता पाटील यांच्या बायोग्राफीमध्ये लेखिका मैथिली राव यांनी राज आणि स्मिता यांच्या लग्नाविषयी लिहिले आहे. राज स्मिता यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. त्यामुळे त्यांनी पहिल्या पत्नीला सोडून स्मितासोबत लग्न करण्याचा विचार केला होता. पण स्मिता यांच्या घरातून देखील या नात्याला विरोध होता.
स्मिता यांनी राज यांच्यासोबत लग्न करू नये असे स्मिता यांच्या आईचे मत होते. त्यांच्या आईने त्यांना अनेकवेळा समजावले. पण स्मिता कोणाचेही ऐकायला तयार नव्हत्या आणि त्यांनी लग्न केले. लग्नाच्या काहीच महिन्यात त्यांच्या आयुष्यात गोंडस बाळाचा प्रवेश झाला. २८ नोव्हेंबर १९८६ ला त्यांचा मुलगा प्रतीक बब्बरचा जन्म झाला. पण प्रतीकच्या जन्मानंतर काहीच दिवसांत म्हणजेच १३ डिसेंबरला स्मिता यांचे निधन झाले. स्मिता यांच्या निधनामुळे राज बब्बर यांना चांगलाच धक्का बसला होता.