OMG! राज कपूर यांना चक्क एका दिग्दर्शकाने मारली होती कानाखाली, हे होते त्याचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 02:46 PM2020-06-02T14:46:18+5:302020-06-02T14:55:38+5:30
राज कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चक्क एक कानाखाली खाल्ली होती.
बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला आणि २ जून १९८८ रोजी या महान अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर कुटुंबाबद्दल प्रत्येकजण जाणतो. पृथ्वीराज कपूर यांनी या साम्राज्याचा पाया रचला. पुढे त्यांची मुले राज कपूर, शम्मी कपूर , शशी कपूर यांनी हा वारसा पुढे नेत बॉलिवूडमध्ये अढळ स्थान निर्माण केले. राज कपूर तर बॉलिवूडचे शो मॅन ठरले.
राज कपूर यांनी वयाच्या ११ व्या वर्षी बाल कलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. १९३५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इन्कलाब’ या चित्रपटात ते बालकलाकार म्हणून झळकले होते. राज कपूर यांचे चित्रपट आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या खऱ्या आयुष्यातले किस्सेही लोकांच्या मनात ताजे आहेत. आजही सिनेप्रेमी हे किस्से जाणून घ्यायला उत्सुक असतात. असाच एक इंटरेस्टिंग किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
राज कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चक्क एक कानाखाली खाल्ली होती. बॉम्बे टॉकीजचे संस्थापक राजनारायण दुबे यांचे नातू अभय कुमार यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे आजोबा सांगायचे की, बॉम्बे टॉकीजमध्ये जो कानाखाली खातो, त्याला आयुष्यात प्रचंड यश मिळते. राज कपूर यांनी देखील या बॉम्बे टॉकीजमध्ये कानाखाली खाल्ली होती. राज कपूर एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. केदार शर्मा या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक होते. क्लॅप करून ज्यावेळी केदार शर्मा चित्रीकरण सुरू करायला सांगत, त्यावेळी प्रत्येकवेळी राज कपूर कॅमेऱ्याच्या समोर येऊन केस व्यवस्थित करत असत... केदार शर्मा यांनी ही गोष्ट दोनदा-तीनदा पाहिली आणि अखेरीस त्यांनी राज कपूर यांच्या कानाखाली वाजवली. पण याच कानाखालीमुळे राज कपूर यांचे भाग्य बदलले असे म्हटले जाते. पुढे जाऊन राज कपूर ही गोष्ट विसरले होते आणि त्यांनी केदार शर्मा यांच्या नील कमल या चित्रपटात मधुबाला यांच्यासोबत काम केले होते.