Raj Kapoor Death Anniversary : ...यामुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 02:00 PM2019-06-02T14:00:09+5:302019-06-02T14:01:24+5:30
बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला आणि २ जून १९८८ रोजी या महान अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणा-या कपूर कुटुंबाबद्दल प्रत्येकजण जाणतो.
बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला आणि २ जून १९८८ रोजी या महान अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणा-या कपूर कुटुंबाबद्दल प्रत्येकजण जाणतो. पृथ्वीराज कपूर यांनी या साम्राज्याचा पाया रचला. पुढे त्यांची मुले राज कपूर, शम्मी कपूर , शशी कपूर यांनी हा वारसा पुढे देत, बॉलिवूडमध्ये अढळ स्थान निर्माण केले. राज कपूर तर बॉलिवूडचे शो मॅन ठरले. पुढे राज कपूर यांची मुले रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि काही प्रमाणात राजीव कपूर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेला. रणधीर व ऋषी कपूर बरेच पुढे निघून गेलेत. पण राजीव कपूरला मात्र आपल्या भावंडांच्या तुलनेत फार यश मिळू शकले नाही. राजीव कपूर यासाठी त्यांचे वडिल राज कपूरला जबाबदार मानत. मधु जैन यांनी लिहिलेल्या ‘द कपूर्स’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे.
‘ एक जान है हम’ या चित्रपटाद्वारे राजीवने त्याच्या कारकिदीर्ला सुरुवात केली. पण हा चित्रपट आपटला. त्यामुळे ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी मुलाला पुन्हा लाँच करण्याचे ठरवले. हा चित्रपट प्रचंड गाजला. सुपरडुपर हिट झाला. पण राजीव कपूरमुळे नाही तर मंदाकिनीच्या एका सीनमुळे. होय, धबधब्याखाली मंदाकिनीने दिलेला या चित्रपटातील एक सीन चांगलाच चर्चेत राहिला. एकीकडे या सीनची आणि या सीनमुळे चित्रपटाची चर्चा वाढत होती. दुसरीकडे या चित्रपटाचा हिरो राजीव कपूरची आपल्या वडिलांवरची म्हणजे, राज कपूर यांच्यावरची नाराजी वाढत चालली होती. मंदाकिनी या चित्रपटामुळे स्टार झाली, पण राजीवला हे यश चाखता आले नाही. याचा दोष त्याने वडिलांना दिला.
‘राम तेरी गंगा मैली’नंतर राज कपूर यांनी आपल्यासाठी आणखी एक चित्रपट बनवावा, अशी राजीवची इच्छा होती. या चित्रपटातून एखाद्या स्टारसारखे प्रोजेक्ट केले जावे, असे त्याला हवे होते. पण राजीवची इच्छा असूनही राज कपूर यांनी असे काही केले नाही. याऊलट राजीवला एक अस्टिस्टंट म्हणून ठेवले. राजीव कपूर युनिटची सगळी काम करायचा. राजीवच्या मनातील वडिलांबद्दलची नाराजी यामुळे वाढत गेली. त्यामुळे ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानंतर राजीवने कधीच राज कपूर यांच्यासोबत काम केले नाही. राजीव आणि राज यांच्यात या चित्रपटामुळे इतका दुरावा निर्माण झाला होता की, राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला देखील राजीव आला नाही.
‘राम तेरी गंगा मैली’नंतर राजीव कपूर लव्हर बॉय, अंगारे, जलजला, हम तो चले परदेस अशा चित्रपटात दिसला. पण हे चित्रपट आर के बॅनरचे नव्हते.