Rajiv Kapoor Death: ...यामुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 02:25 PM2021-02-09T14:25:39+5:302021-02-09T14:26:50+5:30
‘राम तेरी गंगा मैली’नंतर राज कपूर यांनी आपल्यासाठी आणखी एक चित्रपट बनवावा, अशी राजीव यांची इच्छा होती. पण...
ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते.
हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणा-या कपूर कुटुंबाबद्दल प्रत्येकजण जाणतो. पृथ्वीराज कपूर यांनी या साम्राज्याचा पाया रचला. पुढे त्यांची मुले राज कपूर, शम्मी कपूर , शशी कपूर यांनी हा वारसा पुढे देत, बॉलिवूडमध्ये अढळ स्थान निर्माण केले. राज कपूर तर बॉलिवूडचे शो मॅन ठरले. पुढे राज कपूर यांची मुले रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि काही प्रमाणात राजीव कपूर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेला. रणधीर व ऋषी कपूर बरेच पुढे निघून गेलेत. पण राजीव कपूर यांना मात्र आपल्या भावंडांच्या तुलनेत फार यश मिळू शकले नाही. राजीव कपूर यासाठी त्यांचे वडिल राज कपूरला जबाबदार मानत. मधु जैन यांनी लिहिलेल्या ‘द कपूर्स’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे.
‘ एक जान है हम’ या चित्रपटाद्वारे राजीव यांनी त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण हा चित्रपट आपटला. त्यामुळे ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी मुलाला पुन्हा लाँच करण्याचे ठरवले. हा चित्रपट प्रचंड गाजला. सुपरडुपर हिट झाला. पण राजीव कपूरमुळे नाही तर मंदाकिनीच्या एका सीनमुळे. होय, धबधब्याखाली मंदाकिनीने दिलेला या चित्रपटातील एक सीन चांगलाच चर्चेत राहिला. एकीकडे या सीनची आणि या सीनमुळे चित्रपटाची चर्चा वाढत होती. दुसरीकडे या चित्रपटाचा हिरो राजीव कपूर यांची आपल्या वडिलांवरची म्हणजे, राज कपूर यांच्यावरची नाराजी वाढत चालली होती. मंदाकिनी या चित्रपटामुळे स्टार झाली, पण राजीव यांना हे यश चाखता आले नाही. याचा दोष राजीव यांनी वडिलांना दिला.
‘राम तेरी गंगा मैली’नंतर राज कपूर यांनी आपल्यासाठी आणखी एक चित्रपट बनवावा, अशी राजीव यांची इच्छा होती. या चित्रपटातून एखाद्या स्टारसारखे प्रोजेक्ट केले जावे, असे त्यांना हवे होते. पण राजीव यांची इच्छा असूनही राज कपूर यांनी असे काही केले नाही. याऊलट राजीव राजीव यांना एक अस्टिस्टंट म्हणून ठेवले. राजीव यांच्या मनातील वडिलांबद्दलची नाराजी यामुळे वाढत गेली. त्यामुळे 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटानंतर राजीव यांनी कधीच राज कपूर यांच्यासोबत काम केले नाही. राजीव आणि राज यांच्यात या चित्रपटामुळे इतका दुरावा निर्माण झाला होता की, राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला देखील राजीव आले नव्हते.
‘राम तेरी गंगा मैली’नंतर राजीव कपूर लव्हर बॉय, अंगारे, जलजला, हम तो चले परदेस अशा चित्रपटात दिसले होते. पण हे चित्रपट आर के बॅनरचे नव्हते.