राजीव कपूर अनेक वर्षांनी करणार होते हे काम, पण त्यांचे स्वप्न राहिले अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:17 PM2021-02-10T16:17:40+5:302021-02-10T16:19:35+5:30
राजीव कपूर या गोष्टीमुळे काही महिन्यांपूर्वी चर्चेत आले होते.
ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनामुळे चांगलाच धक्का बसला आहे. राजीव काल सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित होते. त्यांनी सकाळचा नाश्ता केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागले आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
राजीव कपूर तब्बल २८ वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर परतणार होते. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटात ते लीड रोल साकारताना दिसणार होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता. यानंतर राजीव यांनी कुठल्याच चित्रपटात अभिनय केला नाही. पण अनेक वर्षांनंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत परतण्याचे ठरवले होते. पण त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली.
राजीव कपूर यांनी एक जान है हम या चित्रपटाद्वारे कारकिर्दीला सुरुवात केली. पण हा चित्रपट आपटला. त्यामुळे ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी मुलाला पुन्हा लाँच करण्याचे ठरवले. हा चित्रपट प्रचंड गाजला. सुपरडुपर हिट झाला. पण राजीव कपूरमुळे नाही तर मंदाकिनीच्या एका सीनमुळे. होय, धबधब्याखाली मंदाकिनीने दिलेला या चित्रपटातील एक सीन चांगलाच चर्चेत राहिला होता. राम तेरी गंगा मैली नंतर राजीव कपूर यांनी लव्हर बॉय, अंगारे, जलजला, हम तो चले परदेस अशा चित्रपटात काम केले. पण या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही.