धोनी-सचिननंतर आता सौरभ गांगुलीचा बायोपिक येणार, 'हा' अभिनेता आहे मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:40 IST2025-02-21T13:25:25+5:302025-02-21T13:40:03+5:30
सौरभ गांगुलीच्या भूमिकेत कोणता अभिताना असणार? हे नावदेखील समोर आलं आहे.

धोनी-सचिननंतर आता सौरभ गांगुलीचा बायोपिक येणार, 'हा' अभिनेता आहे मुख्य भूमिकेत
Sourav Ganguly Biopic: बॉलिवूडमध्ये विविध खेळांवर तसंच खेळाडुंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आले आहेत. आजवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी बहुतांश चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याचं दिसून आलं आहे. आता मनोरंजनाचे चौकार-षटकार मारायला आणखी एक सिनेमा येणार आहे. क्रिकेटचा 'दादा' सौरभ गांगुलीचं आयुष्य (Sourav Ganguly Biopic) आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. या सिनेमात सौरभ गांगुलीच्या भूमिकेत कोणता अभिताना असणार? हे नावदेखील समोर आलं आहे.
सौरव गांगुलीची भूमिका साकारणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याचं नाव जाहीर झालं आहे. माजी कर्णधाराने स्वतः हे जाहीर केलं आहे. हा अभिनेता आहे राजकुमार राव. बायोपिकमध्ये मोठ्या पडद्यावर सौरभ गांगुली ही मुख्य भूमिका राजकुमार राव साकारणार (Rajkummar Rao Playing Cricket Legend Sourav Ganguly) आहे. गुरुवारी पश्चिम बंगालमधील माध्यमांशी बोलताना सौरभ गांगुली म्हणाला, "मी जे ऐकले आहे त्यानुसार, राजकुमार राव (मुख्य भूमिका) साकारतील, परंतु तारखेचा प्रश्न आहे, त्यामुळे सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल".
'दादा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरभ गांगुलीने क्रिकेटच्या जगात एक अनोखी छाप सोडली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत ११३ कसोटी सामने आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो बीसीसीआयचा अध्यक्ष आणि आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. टीम इंडियाचे नशीब बदलणाऱ्या भारताच्या कर्णधारांमध्ये गांगुलीची गणना होते. ज्या कर्णधाराने भारताला जिंकायला शिकवले आणि परदेशी भूमीवर वर्चस्व गाजवले. सध्या सौरभ गांगुली कोलकात्यात राहतो. त्यांचे घर महालापेक्षा कमी नाही. त्याला बंगालचा राजा म्हणूनही ओळखलं जातं.
सौरभ गांगुलीच्या बायोपिकच्या आधी राजकुमार राव आगामी 'भूल चुक माफ' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात अभिनेत्री वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय त्याच्याकडे 'मलिक' सिनेमा आहे, ज्यामध्ये तो अॅक्शन करताना दिसणार आहे. तर 'टोस्टर'मध्ये एका कंजूष पतीची भूमिका साकारतानाही दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.