'ये है रजनी स्टाईल'; रजनीकांत जाहिरात करत नाहीत, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 06:57 PM2018-12-02T18:57:20+5:302018-12-02T18:59:00+5:30
बॉलिवूड इंडस्ट्रीजमधील सर्वच स्टार अन् सुपरस्टार कलाकार कुठल्यातरी कंपनीचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत.
मुंबई - सुपरस्टार रजनीकांत यांचा 2.0 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला दाक्षिणात्य प्रेक्षकांनी नेहमीप्रमाणेच डोक्यावर घेतलंय. आपल्या आवडत्या हिरोची पडद्यावरील एक एंट्री पाहण्यासाठीही येथील चाहते तुफान गर्दी करतात. तर, काही चाहते रजनीकांता यांना चक्क देव मानतात. आपल्या चाहत्यांचा आदरही रजनीकांत तितकाच करतात हे आपल्याला दिसेल. कारण, रजनीकांत यांनी आजपर्यंत कुठल्याही मोठ्या ब्रँडची जाहिरात न स्विकारण्याचे कारणही त्यांचे चाहतेच आहेत.
बॉलिवूड इंडस्ट्रीजमधील सर्वच स्टार अन् सुपरस्टार कलाकार कुठल्यातरी कंपनीचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील महेशबाबू अनेक स्टार कंपन्यांचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. तर, सचिनपासून ते कोहलीपर्यंत दिग्गज क्रिकेटरही जाहिरातींमध्ये झळकतात. मात्र, रजनीकांत कधीही जाहिरातींमध्ये झळकत नाहीत. थलैवा, सुपरस्टार रजनी आण्णा कधीही कुठल्याही वस्तूची किंवा कंपनीची जाहिरात करताना दिसत नाहीत. आता, पुन्हा एकदा थलैवा चर्चेत आहे. कारण, रजनीकांत यांच्या 2.0 या चित्रपटाने 2 दिवसातच 100 कोटी रुपयाचा गल्ला जमवला आहे. यावरून रजनीकांतची चाहत्यांमधील असलेली क्रेझ दिसून येते. त्याला, कारण म्हणजे रजनीकांतही आपल्या चाहत्यांवर तितकंच प्रेम करतात.
रजनीकांत नीतिसंपन्न आणि आपल्या चाहत्यांची काळजी करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळेच त्यांनी करोडो रुपयांच्या जाहिरातींच्या ऑफर नाकारल्या आहेत. रजनीकांत यांना अनेक जगप्रसिद्ध ब्रँडने विचारणा केलेली पण त्यांनी सर्वाना नकार दिला. भारतात कोला कंपनीने तर करोडोंची ऑफर रजनीकांत याना देऊ केली होती. पण, त्यांनी कोलाच्या प्रतिनिधीला भेटायचे नाकारले होते.
रजनीकांत यांच्या मते त्यांचे चाहते त्यांना देवासारखे मानतात, त्यांचे अनुकरण करतात. रजनीकांत पैसे घेऊन एखाद्या वस्तूची जाहिरात करतील तर त्यांचे चाहते त्यांचे अनुकरण करून त्या वस्तू विकत घेतील. हा सरासर धोका असल्याचे रजनीकांत यांना वाटते. तसेच देवाने कोक किंवा इतर पदार्थ विकले तर ते कसे वाटेल. रजनीच्या चाहत्यांना हे आवडणारे नाही, असा विचार रजनीकांत करतात. त्यामुळेच रजनी यांनी आपल्या 43 वर्षांच्या कारकिर्दीत जाहिरातींद्वारे पैसे कमावण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे रजनीकांत हे देशातील सर्वच सिनेकलाकारांपेक्षा आपली वेगळी इमेज तयार बनवून आहेत. कारण, ये रजनी तो स्टाईल है.