'तिला भेटणार होतो, पण तिचं प्रेतचं न्यावं लागलं'; पहिल्या पत्नीविषयी बोलताना राजपाल यादव भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 01:53 PM2023-06-26T13:53:23+5:302023-06-26T13:55:47+5:30
Rajpal yadav:आजवर वेगवेगळ्या भूमिकासाठी ओळखला जाणारा राजपाल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
अक्षय कुमारच्या भुलभुलैय्या या सिनेमातील छोटे पंडित साऱ्यांच्याच लक्षात असेल. अभिनेता राजपाल यादव याने ही भूमिका उत्तमरित्या साकारली होती. त्यामुळे आजही अनेक जण त्याला या भूमिकेसाठी ओळखतात. राजपालने आपल्या दमदार अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये त्याचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. आजवर वेगवेगळ्या भूमिकासाठी ओळखला जाणारा राजपाल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
अलिकडेच राजपालने 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या पहिल्या पत्नीच्या निधनावर भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे त्याने केलेल्या खुलाश्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले. "वयाच्या २० व्या वर्षीच माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर माझ्या पहिल्या पत्नीने मुलीला जन्म दिला. मात्र, डिलिव्हरीच्या वेळी माझ्या पत्नीचं निधन झालं. मला दुसऱ्या दिवशी तिला भेटायचं होतं. पण, मला थेट तिचं प्रेतच खांद्यावरुन घेऊन जावं लागलं. मी माझ्या कुटुंबाचे, आईचे, वहिनीचे आभार मानतो. कारण, त्यांनी माझ्या मुलीला कधीच आईची उणीव भासू दिली नाही.", असं राजपाल म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "१९९१ मध्ये माझ्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मी अभिनेता म्हणून माझी ओळख निर्माण केली. पण, यासाठी मला १३ वर्ष लागली. या दरम्यान मी एनएसडीमध्ये शिक्षण घेतलं. टीव्ही मालिका, सिनेमा केले."
दरम्यान, २००० साली राजपालचा जंगली हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटातून त्याला खऱ्या अर्थाने यश मिळालं. त्यानंतर त्याने ‘दिल क्या करे’, ‘कंपनी’, ‘हम किसी से कम नहीं’, ‘हंगामा’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘मैं मेरी पत्नी और वो’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘फिर हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ चुप चुपके’ आणि ‘भूल भुलैया’ यांसारखे गाजलेले सिनेमे केले.