राजपाल यादवने बॉलिवूडची केली पोलखोल, म्हणाला - '...तुम्हाला इथे कुणी विचारत नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 12:43 PM2021-03-17T12:43:32+5:302021-03-17T12:44:25+5:30
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवने नुकतेच बॉलिवूडमध्ये त्याला आलेल्या अनुभवाबद्दल खुलासा केला आहे.
नाण्याच्या दोन बाजूप्रमाणेच बॉलिवूडला देखील दोन बाजू आहे. भलेही आपल्याला बाहेरून झगमगती सिनेइंडस्ट्रीत दिसत असली तरी त्याला काळी बाजू देखील आहे. गटबाजी, कास्टिंग काउच, नेपोटिझम असे अनेक मुद्द्यांनी बॉलिवूडची काळी बाजू प्रकर्षाने दाखवून दिली आहे. या सिनेइंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेकांनी बॉलिवूडची काळी बाजू समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवने नुकतेच बॉलिवूडमध्ये त्याला आलेल्या अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. गेल्या २३ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या राजपाल यादवला अद्याप एकही चांगला मित्र या सिनेइंडस्ट्रीने दिला नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे. तसेच.गटबाजीत पडू नका, पैसे घ्या आणि काम करा, हे त्याचे तत्वदेखील त्याने यावेळी सांगितले.
अभिनेता राजपाल यादवने नुकताच ५०वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याने बॉलिवूडमध्ये आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले.
तो म्हणाला, “बॉलिवूड हे अत्यंत प्रोफेशनल क्षेत्र आहे. इकडे कोणी कोणालाही फायद्याशिवाय मदत करत नाही. जो पर्यंत तुम्ही यशाच्या शिखरावर असता तो पर्यंत तुमच्या आजूबाजूला गर्दी असते. मात्र एकदा तुमच्या करिअरला उतरती कळा लागली की मग तुम्ही सेलिब्रिटी किड्स असला तरी तुम्हाला कोणी विचारत नाही.
जवळपास मी २३ वर्षे बॉलिवूडमध्ये काम केले आहे. १००हून जास्त सिनेमात काम केले आहे. मात्र अद्याप एकही चांगला मित्र या इंडस्ट्रीने मला दिलेला नाही. अर्थात माझा कोणी शत्रू देखील नाही. मी आजवर अजात शत्रू सारखा वागत आलो आहे. मी चित्रपट निवडताना केवळ व्यक्तिरेखा पाहतो अन् मला किती मानधन मिळणार याबद्दल विचारतो. तो कुठल्या ग्रुपमधील आहे. स्टार किड आहे का? त्याच्यासोबत काम केल्यावर कोणी माझ्यावर नाराज होईल का? असे विचार मी करत नाही. सर्वांसोबत मैत्री ठेवा आणि कोणालाही नाराज करु नका? हे तत्वज्ञान मी बॉलिवूडमध्ये वापरले आहे.