लेकाच्या घटस्फोटावर राकेश रोशन यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाले, "त्यांच्यात जे झालं ते..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:25 IST2025-01-30T16:24:53+5:302025-01-30T16:25:37+5:30
सुझैन खानबद्दल काय म्हणाले राकेश रोशन?

लेकाच्या घटस्फोटावर राकेश रोशन यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाले, "त्यांच्यात जे झालं ते..."
हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुझैन खान (Sussanne Khan) या सेलिब्रिटी जोडप्याचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट म्हणून ओळखला जातो. २०१४ साली दोघं विभक्त झाले. १४ वर्षांचा संसार त्यांनी एका रात्रीत मोडला. यानंतर सुझैन खानने हृतिककडून भलीमोठी पोटगी घेतल्याची चर्चा झाली. म्हणूनच त्यांचा घटस्फोट महागडा असल्याचं बोललं जातं. लेकाच्या घटस्फोटावर नुकतंच राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
'द रोशन्स' ही रोशन कुटुंबाची सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. राकेश रोशन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांचे वडील प्रसिद्ध संगीतकार होते. हृतिकही इंडस्ट्रीत आघाडीचा अभिनेता आहे. या सीरिजच्या निमित्ताने राकेश रोशन अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. दरम्यान एका मुलाखतीत लेकाच्या घटस्फोटावरही त्यांनी भाष्य केलं. 'युवा' युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "जे काही झालं ते त्या दोघांमध्ये झालं. माझ्यासाठी तर सुजैन अजूनही तशीच आहे. ते दोघं प्रेमात पडले, त्यांच्यात काही गैरसमज झाले आणि त्यांनाच ते सोडवायचे आहेत. आमच्यासाठी सुजैन आजही आमच्या घरातील सदस्यच आहे."
हृतिक आणि सुजैन यांना दोन मुलं आहेत. रिहान आणि रिदान अशी त्यांची नावं आहेत. मुलांसाछी हृतिक आणि सुजैन अनेकदा एकत्र येतात. पण सध्या दोघंही वेगवेगळ्या पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. हृतिक सबा आजादला डेट करत आहे तर सुजैन अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे चौघंही अनेकदा पार्टीसाठी भेटतात. सोशल मीडियावर एकमेकांसाठी कमेंट्सही करतात. त्यांचं हे विचित्र नातं पाहून अनेक नेटकरी त्यांना ट्रोल करतात.