Chhatriwali Movie Review : लैंगिक शिक्षणाचा हलकाफुलका ‘क्लास’ घेणारा रकुल प्रीत सिंगचा 'छत्रीवाली'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 04:13 PM2023-01-20T16:13:15+5:302023-01-20T16:29:43+5:30

कलाकार : रकुल प्रीत सिंह, सुमित व्यास, सतीश कौशिक, डॉली अहलुवालिया, राजेश तेलंग  लेखक : संचित गुप्ता आणि प्रियदर्शी ...

Rakul Preet Singh Chhatriwali movie review | Chhatriwali Movie Review : लैंगिक शिक्षणाचा हलकाफुलका ‘क्लास’ घेणारा रकुल प्रीत सिंगचा 'छत्रीवाली'

Chhatriwali Movie Review : लैंगिक शिक्षणाचा हलकाफुलका ‘क्लास’ घेणारा रकुल प्रीत सिंगचा 'छत्रीवाली'

googlenewsNext

कलाकार : रकुल प्रीत सिंह, सुमित व्यास, सतीश कौशिक, डॉली अहलुवालिया, राजेश तेलंग 
लेखक : संचित गुप्ता आणि प्रियदर्शी श्रीवास्तव.
दिग्दर्शक : तेजस प्रभा विजय देओस्कर
निर्माता : रॉनी स्क्रूवाला
रेटिंग : तीन स्टार 
चित्रपट परीक्षण : अबोली शेलदरकर

लैंगिक संबंधांवर भाष्य करणारे सिनेमे आत्तापर्यंत बरेच आलेत. उघडपणे बोला, शाळांमध्ये मुलांनाही याविषयी माहिती दिली पाहिजे, अशा आशयाचे अनेक सिनेमे प्रदर्शित झालेत. पण, अजूनही ‘सेक्स’ या शब्दाकडे कान टवकारतात. शहरात असो किंवा ग्रामीण भागात; आजही लैंगिक संबंधांबद्दल जागरूकता आलेली नाही. थोडक्यात काय, तर कंडोमचा वापर करून सुरक्षित लैंगिक संबंध ठेवता येतात, असे सांगणारा ‘छत्रीवाली’ हा सिनेमा गुरुवारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. रकुल प्रीत सिंग आणि सुमित व्यास यांच्या मुख्य भूमिकांमधील हा चित्रपट कसा आहे, ते आपण बघूया.

कथानक : चित्रपटाची कथा हरयाणाच्या करनाल या गावापासून सुरू होते. या गावातील तरुणी सान्या (रकुल प्रीत सिंग) हिची ही कथा आहे. सान्या खोटं बोलते आणि सर्वांना सांगते की, ती छत्रीच्या कारखान्यात काम करते. खरे तर ती कंडोम कारखान्यात कंडोम टेस्टर म्हणून काम करते, हे लोकांना सांगायला लाज वाटते. दुसरे म्हणजे बहुतेक ठिकाणी कंडोमला छत्री असंही म्हटलं जातं. सान्या रसायनशास्त्रात अत्यंत हुशार आहे, तिला आपल्या कामाबद्दल आदरही आहे; परंतु लोकांना कंडोम फॅक्टरीबद्दल सांगण्याची लाज वाटते. तिचे लग्न सुमित व्यासशी होते; पण त्याची बायको कुठे काम करते हे त्याला कळत नाही. काही संघर्षांनंतर सान्या तिच्या कुटुंबाला आणि समाजाला हे पटवून देण्यात यशस्वी ठरते की, लैंगिक शिक्षण आणि कंडोमच्या वापराबद्दल उघडपणे बोलणे अजिबात चुकीचं नाही.

लेखन व दिग्दर्शन : हसतखेळत गंभीर विषय हाताळणे हे फार कमी चित्रपटाच्या दिग्दर्शकांना जमते. लैंगिक शिक्षणावर उघडपणे बोलण्याचा प्रयत्न दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देओस्कर यांच्याकडून झाला आहे. गर्भपाताच्या गोळ्यांच्या वारंवार वापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि मध्यम शाळेतील मुलांसाठी पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचे संवेदनशीलतेने नेमके चित्रण करतो. या चित्रपटाची कथा-पटकथा संचित गुप्ता आणि प्रियदर्शी श्रीवास्तव यांची असून अत्यंत हळूवारपणे पण गमतीजमतीच्या वातावरणात त्यांनी हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट धीम्या गतीने सुरू होतो, पण, सान्याच्या हालचालींना मध्यांतरानंतर वेग येतो. संपूर्ण चित्रपट सान्याभोवती फिरणारा असल्याने तिच्या कल्पनांकडे आपण आकर्षित होतो.

अभिनय : ‘दे दे प्यार दे’, ‘डॉक्टर जी’ आणि ‘थँक गॉड’ यासारख्या अनेक चित्रपटातून रकुल प्रीत सिंगने भूमिका साकारल्या. मात्र, ही भूमिका वेगळी वाटते. संवादफेक आणि देहबोलीसाठी रकुल काही ठिकाणी कमी पडली आहे. पात्राच्या ड्रेसिंग स्टाईलबद्दलही काही ठिकाणी संभ्रम दिसतो. सुमीत व्यास आणि रकुल यांची जोडी पडद्यावर चांगली दिसते. राकेश बेदी आणि राजेश तेलंग यांना अनेक वर्षानंतर त्यांच्या अभिनयातील चमक दाखवण्याची संधी मिळालीय, ती त्यांनी उत्तमरित्या सांभाळली. डॉली अहलूवालिया, सतीश कौशिक, प्राची शाह आणि रिवा अरोरा यांनीही त्यांच्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत.

सकारात्मक बाजू : रकुल प्रीत सिंगचा अभिनय, कथा-पटकथा आणि विषय
नकारात्मक बाजू : काही विशेष नाही
थोडक्यात : शाळकरी मुलांपर्यंत लैंगिक शिक्षण हा विषय पोहोचणं आवश्यक आहे. रकुलचा अभिनय आणि सुमीत व्यासची भक्कम साथ अनुभवायची असेल तर चित्रपट जरूर बघावा.


 

Web Title: Rakul Preet Singh Chhatriwali movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.