मरजावाँ या चित्रपटासाठी रकुल प्रीत सिंगला शिकाव्या लागल्या या गोष्टी
By प्राजक्ता चिटणीस | Published: November 4, 2019 06:00 AM2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:01+5:30
दे दे प्यार दे या चित्रपटातील रकुलचा लूक आणि मरजावाँ या चित्रपटातील लूक, भूमिका यांच्यात जमीन आस्मानचा फरक आहे.
मरजावाँ या चित्रपटात आपल्याला रकुल प्रीत सिंग एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने नुकतेच दे दे प्यार दे या चित्रपटात काम केले होते. तिच्या या भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. तिच्या या नव्या चित्रपटाबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...
मरजावाँ या चित्रपटातील तुझी भूमिका ही खूप खास असल्याचे म्हटले जात आहे, हे खरे आहे का?
ऐंशी-नव्वदीच्या दशकातील चित्रपटांमध्ये आपल्याला ज्याप्रकारच्या भूमिका पाहायला मिळायच्या, तशीच माझी या चित्रपटातील भूमिका आहे. मुक्कदर का सिकंदर या चित्रपटातील रेखा यांच्या भूमिकेप्रमाणे किंवा जीत या चित्रपटातील तब्बूच्या भूमिकेसारखी भूमिका मी या चित्रपटात साकारत आहे. या चित्रपटात मी एका खास भूमिकेत असून माझ्या भूमिकेमुळे या चित्रपटाच्या कथानकाला वळण मिळणार आहे.
या चित्रपटातील भूमिकेसाठी काही विशेष मेहनत घ्यावी लागली का?
या चित्रपटात मी एका बार डान्सरच्या भूमिकेत असल्याने त्यांची देहबोली शिकणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. तसेच त्यांची बोलण्याची एक वेगळी ढब असते. ती देखील मला या चित्रपटासाठी शिकावी लागली. दे दे प्यार दे या चित्रपटातील माझा लूक आणि या चित्रपटातील माझा लूक, माझी भूमिका यांच्यात जमीन आस्मानचा फरक आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळी रकुल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
दे दे प्यार दे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याआधी तू प्रचंड टेन्शनमध्ये होतीस, आता पण तितकेच टेन्शन आहे का?
दे दे प्यार दे हा माझा पहिला हिंदी चित्रपट असल्याने प्रेक्षक मला स्वीकारतील का याचे मला टेन्शन आले होते. पण आता या चित्रपटाच्या यशानंतर माझे दडपण थोडेसे कमी झाले आहे. पण तरीही ज्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार त्यादिवशी थोडेसे टेन्शन नक्कीच असेल यात काही शंका नाही.
दाक्षिणात्य चित्रपटांपासून सुरू झालेल्या तुझ्या अभिनयप्रवासाविषयी काय सांगशील?
मी पोर्टफोलियो तयार केल्यानंतर केवळ काहीच दिवसांत मला माझ्या पहिल्या दाक्षिणात्य चित्रपटाची ऑफर मिळाली. मी पंजाबी असल्याने दक्षिणेत काम करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण सुरुवातीच्या काळात मी अक्षरशः संवाद तोंडपाठ करायचे. पहिला चित्रपट मी केवळ पॉकेट मनीसाठी केला होता. पण या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मला अनेक ऑफर मिळायला लागल्या आणि आता तर मी दक्षिणेत अनेक चित्रपट केले असून मी दाक्षिणात्य भाषा देखील शिकले आहे.