‘RRR’च्या हिंदी व्हर्जनमध्ये ज्युनिअर एनटीआर व रामचरणला कोणी आवाज दिला माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:58 PM2022-03-31T17:58:40+5:302022-03-31T17:59:55+5:30
RRR : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटानं आधीच हवा करून ठेवली होती. 25 मार्चला हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला आणि या चित्रपटानं धुमाकूळ घातला.
दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटानं आधीच हवा करून ठेवली होती. 25 मार्चला हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला आणि या चित्रपटानं धुमाकूळ घातला. देशातचं नाही तर जगभर राजमौलींच्या या चित्रपटाची चर्चा झाली. कमाई तर इतकी की सगळ्यांनीच बोटं तोंडात घातली. तीनच दिवसांत या चित्रपटानं वर्ल्डवाईड 500 कोटींचा पल्ला गाठला. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही कमाल केली. पाचच दिवसांत 100 कोटींवर गल्ला जमवला.
‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. हिंदी व्हर्जनमध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या भूमिकेचं डबिंग नक्की कोणी केलं असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. तुम्हाला आठवत असेलच की, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे यानं आवाज दिला होता. त्याची जोरदार चर्चा झाली होती. साहजिकच ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनमध्ये रामचरण (Ram Charan) व ज्युनिअर एनटीआरच्या (Jr. NTR) भूमिकांना कोणी आवाज दिला हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल.
तर त्याचं उत्तर आहे खुद्द रामचरण व ज्युनिअर एनटीआर यांनीच. होय, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला स्वत:चा आवाज दिला आहे. द कपिल शर्मा शोमध्ये खुद्द एनटीआरनं याचा खुलासा केला होता.‘हैदरादमध्ये अनेक लोक हिंदी भाषेत बोलतात. तसेच शाळेत असताना मी हिंदी भाषेमधून शिक्षण घेतलं. कारण माझ्या आईची इच्छा होती की मी ही भाषा शिकावी,’असं ज्युनिअर एनटीआरनं या शोमध्ये सांगितलं होतं.
‘आरआरआर’ने वीकेंडला धमाकेदार कमाई केली होती. 6 दिवसांत या चित्रपटाने जगभरात 611 कोटींचा बिझनेस केला आहे. काल बुधवारी पुन्हा एकदा तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. या चित्रपटाने बुधवारी केवळ हिंदी व्हर्जनमधून जवळपास 13.50 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. 6 दिवसांत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने एकूण 120 कोटींची कमाई केली आहे.