ना देव...ना कोरोना...! राम गोपाल वर्मा यांनी तयार केला कोरोनावरचा जगातला पहिला सिनेमा, पाहा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 10:27 AM2020-05-27T10:27:41+5:302020-05-27T14:44:11+5:30
या स्टोरीच्या बॅकड्रॉपमध्ये लॉकडाऊन आहे आणि हा सिनेमाही लॉकडाऊनमध्ये शूट झाला आहे.
कोरोना व्हायरसने अख्ख्या जगात थैमान घातले आहे़ भारतातही वेगळी स्थिती नाही. कोरोना रूग्णांची संख्या लाखावर पोहोचली आहे. बळींची संख्या हजारोच्या घरात आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा. या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी सरकार कडून वारंवार सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.
या लॉकडाऊनमुळे बॉलिवूडही ठप्प आहे. पण कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळातही ट्रेलर मात्र रिलीज होत आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कोरोनावर एका सिनेमाची तयारी सुरु केली आहे. ‘कोरोना व्हायरस’ असे या सिनेमाचे नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. एकंदर काय तर एकीकडे कोरोनाचे वाढते संक्रमण आणि दुसरीकडे दिग्दर्शक राम गोपाल वर्मांचा या व्हायरसवरचा जगातील पहिला सिनेमा. हा सिनेमाा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम गोपल वमार्नं त्याच्या ट्विटर हँडलवर या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा एक तेलुगू सिनेमा आहे.
काय आहे कथा
या ट्रेलरमध्ये एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. ट्रेलरची सुरुवात होते ती, कोरोनाची दहशत दाखवणा-या बातम्यांपासून. न्यूजपासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली दिसत आहे. अशात ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या कुटुंबातील एका मुलीला खोकला सुरू होतो. त्यामुळे ते संपूर्ण कुटुंब तिची कोरोना टेस्ट करावी की नाही याचा विचार करू लागते. भीती आणि कन्फ्यूजनसोबत सिनेमाची कथा पुढे सुरू होते.
वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा ट्रेलर शेअर केला आहे. ‘हा घ्या कोरोना व्हायरस चित्रपटाचा ट्रेलर. या स्टोरीच्या बॅकड्रॉपमध्ये लॉकडाऊन आहे आणि हा सिनेमाही लॉकडाऊनमध्ये शूट झाला आहे. कुणीही तुमचे काम थांबवू शकत नाही,हे मला सिद्ध करायचे आहे. ना देव, ना कोरोना,’ असे त्यांनी लिहिले आहे.