राम गोपाल वर्मांची राजकारणात एन्ट्री! या भागातून निवडणूक लढवण्याची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:41 PM2024-03-14T17:41:11+5:302024-03-14T17:42:44+5:30
राम गोपाल वर्मांनी ट्विट करुन ते राजकारणात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं
सध्या लोकसभा निवडणुकांचं वारं जोरात वाहत आहे. यंदा लोकसभेसाठी अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच दिग्दर्शक - निर्माते राम गोपाल वर्मांनी सुद्धा राजकारणात प्रवेश केल्याची घोषणा केलीय. राम गोपाल वर्मा म्हणजेच बॉलिवूडच्या रामूंनी ट्विटरवर घोषणा करत सर्वांना आश्चर्यचकीत केलंय. रामू कोणत्या भागातून निवडणूक लढवणार? हेही उघड झालंय.
चित्रपट निर्माते - दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी गुरुवारी (14 मार्च) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली. रामू आंध्र प्रदेशातील पिठापुरममधून निवडणूक लढवणार आहेत. रामूंनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर राजकारणात प्रवेश करण्याच्या निर्णयाला 'अचानक' म्हटले आहे. तेलगू देसम पार्टी-भारतीय जनता पार्टी-जन सेना पार्टीने युती जाहीर केल्यावर रामुंनी ही घोषणा केली.
SUDDEN DECISION..Am HAPPY to inform that I am CONTESTING from PITHAPURAM 💪💐
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 14, 2024
राम गोपाल वर्मा यांच्याशिवाय अभिनेता आणि जेएसपी प्रमुख पवन कल्याण सुद्धा पिठापुरम जागेवरून निवडणूक लढवणार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रामू विरुद्ध पवन कल्याण अशी निवडणुकीची चुरस बघायला मिळेल. "अचानक निर्णय..मी पिठापुरममधून निवडणूक लढवत आहे हे कळवण्यास आनंद होत आहे," अशी पोस्ट रामुंनी केली. 'सरकार', 'सत्या', 'रंगीला', 'भूत' असे दर्जेदार सिनेमे बनवणारे राम गोपाल वर्मा राजकारणाच्या रिंगणात कशी बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.