राम-सीता आणि लक्ष्मण पोहचले अयोध्येत! 'रामायण'मधील कलाकार 'हमारे राम आयेंगे' अल्बमच्या शूटिंगसाठी एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 02:23 PM2024-01-17T14:23:56+5:302024-01-17T14:30:37+5:30
'रामायण'मधील मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलिया अयोध्येत दाखल झाले आहेत.
ज्या ऐतिहासिक क्षणाची संपूर्ण देश वाट पाहत आहे तो दूर नाही. आयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत राम, लक्ष्मणा आणि सीता ही भूमिका साकारणारे कलाकार अभिनेता अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलिया हे अयोध्येत पोहचले. यावेळी चाहत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. या तिघांनाही प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 'हमारे राम आयेंगे' अल्बमच्या शूटिंगमध्ये ते सहभाग घेणार आहेत.
अरुण गोविल यांनी चाहत्यांना त्यांच्या अयोध्येतील प्रवासाची एक छोटीशी झलक दाखवली. अयोध्येत पोहोचताच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला. माध्यमांशी बोलताना अरुण गोविल म्हणाले, अयोध्येचे राम मंदिर हे आपलं राष्ट्रीय मंदिर असल्याचं सिद्ध होईल. गेल्या काही वर्षात जगभरात जी संस्कृती लोप पावत चालली होती, ती संस्कृती पुन्हा एकदा मजबूत होईल'.
#WATCH | Delhi: On receiving the invitation for the Ram Mandir 'Pran Pratishtha' Ceremony, Actor Arun Govil who played the role of Lord Ram in the Ramanand Sagar's Ramayan, says, "... I am happy that I received an invitation for the Ram Mandir 'Pran Pratishtha' Ceremony, and I am… pic.twitter.com/m0Ae8vEHWy
— ANI (@ANI) January 12, 2024
चाहत्यांच्या आवडत्या 'सीता' म्हणजेच दीपिका चिखलिया यांनीही अभिषेक सोहळ्यात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, 'आमची प्रतिमा लोकांच्या हृदयात स्थिरावली आहे. राम मंदिर बांधल्यानंतरही त्यात काही बदल होणार नाही'. तर लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लाहिरी म्हणाले की, 'प्राण प्रतिष्ठा महोत्सवाला उपस्थित राहायला मिळणार असल्यामुळे मी स्वतःलाखूप भाग्यवान समजतो. देशात निर्माण झालेले वातावरण अतिशय धार्मिक आहे. राम हे मर्यादा पुरुषोत्तम तर रामायण आपल्याला सन्मानाने जगायला शिकवते, ही शिकवण राम नाकारणाऱ्यांना माहीत नाही'.
'रामायण' मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली. तर अभिनेत्री दीपिका चिखलिया सीतामातेच्या भूमिकेत दिसल्या. तर लक्ष्मणची भूमिका सुनील लाहिरी यांनी साकारली होती. इतक्या वर्षानंतरही रामायण मालिकेतील कलाकारांची आजही जादू कायम आहे. त्यामुळे आजही अरूण गोविल टीव्हीवरचे राम आणि दीपिका चिखलिया सीता म्हणूनच ओळखले जातात. या कलाकारांना लोकांनी खरोखरंच प्रभू श्रीराम आणि सीतामातेचं स्थान दिलं.