चंद्राबाबूंचा फेक फोटो वापरून फसले रामगोपाल वर्मा, एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 03:17 PM2019-04-19T15:17:34+5:302019-04-19T15:19:08+5:30
तेलगू देसम पार्टीच्या एका कार्यकर्त्याने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या फोटोशी छेडछाड करून चुकीचा संदेश पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
ठळक मुद्देरामगोपाल वर्मा यांनी एनटीआर यांच्यावर बनवलेला चित्रपट ‘लक्ष्मी एनटीआर’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटातही चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
तेलगू देसम पार्टीच्या एका कार्यकर्त्याने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या फोटोशी छेडछाड करून चुकीचा संदेश पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
रामगोपाल वर्मा यांनी अलीकडे फेसबुकवर चंद्राबाबू नायडू यांचा एक फोटो शेअर केला होता. यात त्यांना वायएसआर काँग्रेस ज्वॉईन करताना दाखवण्यात आले होते. या फोटोमुळे संतप्त होत, देवीबाबू चौधरी या कार्यकर्त्याने ताडेपल्ली गुडेम पोलिस ठाण्यात रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.
रामगोपाल वर्मा यांच्या या कृत्यामुळे आंध्र प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना चौधरी यांनी सांगितले की, रामगोपाल वर्माविरोधात मी एफआयआर दाखल केला आहे. रामगोपाल वर्मा यांनी शेअर केलेल्या फोटोतून चुकीचा संदेश जातो. हा आमच्या भावनांचा अपमान आहे. रामगोपाल वर्मा चंद्राबाबूंची माफी मागत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरु राहिल.
रामगोपाल वर्मा यांनी चंद्राबाबू नायडू यांच्याशिवाय त्यांचा मुलगा नारा लोकेश, स्नुषा व तिच्या वडिलांबद्दलही आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्याने केलेल्या आरोपानुसार, रामगोपाल वर्मा यांनी नाहक नायडू कुटुंबाला लक्ष्य केले.
रामगोपाल वर्मा यांनी एनटीआर यांच्यावर बनवलेला चित्रपट ‘लक्ष्मी एनटीआर’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटातही चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ‘मी माझ्या आयुष्यात केवळ एकच चूक केली, ती म्हणजे, त्या सापावर विश्वास ठेवला,’असा एनटीआर यांच्या तोंडचा एक संवाद चंद्राबाबूला उद्देशून असल्याचा आरोप तेलगू देसम पार्टीने केला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.