रामी रेड्डी यांचे अखेरच्या दिवसांत झाले प्रचंड हाल, त्यांना ओळखणे देखील झाले होते कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 05:21 PM2021-06-29T17:21:22+5:302021-06-29T17:24:03+5:30
कधी अण्णा, कधी कालिया, स्वामी तर कधी शेट्टी अशा खलनायकी व्यक्तिरेखा साकारत रसिकांची मनं जिंकली. अण्णा साकारणारा हा कलाकार म्हणजे रामी रेड्डी.
हिंदी चित्रपटसृष्टीत नायकांइतकीच खलनायकांना देखील चांगलीच प्रसिद्धी मिळाली. अमरीश पुरी, अमजद खान, गुलशन ग्रोव्हर, अनुपम खेर, कादर खान अशा अनेक दिग्गज कलाकारांनी खलनायक म्हणून रुपेरी पडदा गाजवला. याच कलाकारांसह ९०च्या दशकात कधी अण्णा, कधी कालिया, स्वामी तर कधी शेट्टी अशा खलनायकी व्यक्तिरेखा साकारत रसिकांची मनं जिंकली. अण्णा साकारणारा हा कलाकार म्हणजे रामी रेड्डी.
जीवनयुद्ध, कालिया, लोहा, वक्त हमारा हैं, दिलवाले, ऐलान अशा विविध चित्रपटात भूमिका साकारल्या. मूळचे आंध्रप्रदेशचे असलेल्या रामी रेड्डी यांनी सुरूवातीला पत्रकारिता केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळवला. तिथे जम बसल्यानंतर रेड्डी हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळले. याच भूमिकांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा चांगलाच जम बसला. त्यांच्या दमदार अभिनयामुळे अनेक वैविध्यपूर्ण भूमिका रेड्डी यांच्या वाट्याला आल्या.
दाक्षिणात्य असो किंवा मग हिंदी चित्रपटसृष्टीत इतकं काम केल्यानंतरही रेड्डी यांच्या अखेरच्या दिवसांत बरेच हाल झाले. त्यांना नंतरच्या काळात ओळखणंही कठीण झालं होतं. 2000 साली त्यांना यकृताचा विकार जडला. या आजारामुळे त्यांचं जगणं कठीण झालं. त्यांना बऱ्याच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांनी घराबाहेर पडणं बंद केलं. त्याने रेड्डी यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. या आजाराचा त्यांनी सामना करण्याचा प्रयत्न केला. मात्र या आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. अखेर १४ एप्रिल २०११ रोजी सिकंदराबाद इथल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.