राणा दग्गुबतीचे हे ट्रान्सफोर्मेशन पाहून व्हाल अवाक, पुन्हा बनवले पिळदार शरीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:42 PM2021-02-10T16:42:23+5:302021-02-10T16:43:11+5:30
राणाने पुन्हा एकदा पिळदार शरीर बनवले असून त्याचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे
बॉलिवूडमधीलही काही सिनेमांमध्ये राणा दग्गुबतीने काम केले आहे. पण त्याला सर्वाधिक ओळख मिळाली ती 'बाहुबली'तील भल्लालदेवच्या भूमिकेतून. भल्लालदेवची भूमिका आजही लोकांच्या मनात आहे. तसा म्हणायला प्रभास बाहुबलीचा मुख्य हिरो होता, पण राणाशिवाय या सिनेमाचा विचार केला जात नाही. राणाला या चित्रपटामुळे चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले.
राणाने काही महिन्यापूर्वी एका चित्रपटासाठी त्याचे वजन कमी केले होते. पण आता त्याने पुन्हा एकदा पिळदार शरीर बनवले असून त्याचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत राणाने लिहिले आहे की, माझ्या शरीराला मी पुन्हा पहिल्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याचे चाहते या व्हिडिओला मोठ्या संख्येने लाइक करत आहेत. तसेच राणाचा हा नवा अवतार त्यांना आवडला असल्याचे सांगत आहेत.
राणा लवकरच अभिनेता पवन कल्याणसोबत एका चित्रपटात काम करणार आहे. अयप्पनम कोशियुम या चित्रपटाचा हा रिमेक असणार आहे. तसेच विराट पर्वम या चित्रपटात देखील राणा झळकणार आहे.
राणा दग्गुबातीने काही बॉलिवूड सिनेमात काम केलं. त्याने बिपाशा बासु, अक्षय कुमार यांच्यासोबत चित्रपटात काम केले आहे. साऊथमध्ये त्याने आपली एक वेगळी जागा निर्माण केली. त्याचा हाणामारी करतानाचा अंदाज लोकांना अधिक भावतो. दरम्यान कोरोना काळात राणाने लग्नही केलं. सोशल मीडियावर त्याचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते.