फक्त 'एवढी' होती रणबीर कपूरची पहिली कमाई, पैसे हातात येताच ठेवले होते आईच्या पायाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 11:38 AM2024-07-08T11:38:11+5:302024-07-08T11:39:22+5:30
अभिनेता रणबीर कपूरचे चाहते फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आहेत.
अभिनेता रणबीर कपूरचे चाहते फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. कोट्यवधी लोक त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करतात. दिवसेंदिवस रणबीर यशाचं शिखर गाठत आहे. रणबीर आज एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांची फी आकारतो, पण रणबीरची पहिली कमाई किती होती माहीत आहे का ? त्यानेच याचा खुलासा केला होता. विशेष म्हणजे पहिल्या पगाराचा चेक हातात येताच रणबीरने एक कौतुकास्पद काम केलं होतं. तर ते काय होतं, हे आपण जाणून घेऊया.
रणबीरने 'प्रेम ग्रंथ' (1996) चित्रपटाच्या सेटवर त्याचे काका राजीव कपूर यांना असिस्ट केलं होतं. असिस्ट म्हणून काम केल्यानंतर जे पैसे मिळाले होते, तीच रणबीरची पहिली कमाई होती. 'मॅशेबल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने त्याच्या पहिल्या मानधनाबाबतचा खुलासा केला होता. पहिली कमाई किती होती, यावर उत्तर देताना तो म्हणाला, ''माझा पहिला पगार 250 रुपये होता. जो मला "प्रेम ग्रंथ" या सिनेमासाठी काम केल्यानंतर मिळाला होता. पैसे मिळाल्यानंतर मी एका चांगल्या मुलाप्रमाणे ते माझ्या आईच्या पायाशी ठेवले होते'. तसेच त्याची ही कृती पाहून नितू सिंग रडल्याचंही त्याने सांगितलं.
रणबीर कपूरनेबॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी अनेक सिनेमांसाठी असिस्ट म्हणून काम केलं होतं. यानंतर त्याने संजय लीला भन्साळीच्या 'साँवरिया' या सिनेमाच्या माध्यमातून 2007 मध्ये अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. रणबीर कपूरने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. 'बर्फी', 'रॉकस्टार', 'संजू', 'ये जवानी है दिवानी', 'राजनीती' अशा अनेक सिनेमांत त्याने काम केलं आहे. रणबीरची पहिली कमाई जरी 250 रुपये असली तरी आज 'लाइवमिंट कॉम'च्या रिपोर्टनुसार, तो 345 कोटींचा मालक आहे.
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच त्याच्या 'ॲनिमल' सिनेमानं रेकॉर्डब्रेक कमाई केली. 'ॲनिमल'च्या यशानंतर 'ॲनिमल पार्क'मधून रणबीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय, रणबीर सध्या 'रामायण' सिनेमाचं शूटींग करतोय. यासोबतच रणबीर आणि आलिया दोघंही पुन्हा 'ब्रह्मास्त्र 2' आणि 'लव्ह अँड वॉर' या सिनेमांमध्ये एकत्र दिसणार आहेत.