रणबीर कपूरचा 'रामायण' 3 भागात येणार नाही, नितेश तिवारींनी घेतला महत्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:06 AM2024-05-21T09:06:01+5:302024-05-21T09:07:33+5:30
'रामायण' तीन भागांमध्ये बनणार असल्याचीही चर्चा होती. मात्र आता तसं होणार नाही. नितेश तिवारींनी सिनेमाबाबतीत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) सिनेमाचं शूट सध्या सुरु आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सिनेमात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार आहे तर अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सीतामातेची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच सेटवरुन या दोघांचा लूक व्हायरल झाला होता. तसंच 'रामायण' तीन भागांमध्ये बनणार असल्याचीही चर्चा होती. मात्र आता तसं होणार नाही. नितेश तिवारींनी सिनेमाबाबतीत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे सिनेमाचं टायटलही वेगळं असण्याची चर्चा आहे.
'रामायण' सिनेमाच्या चित्रीकरणालाच 1 वर्ष लागणार आहे. 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, हा सिनेमा तीन नाही तर दोनच भागांमध्ये बनवण्यात येईल असा निर्णय नितेश तिवारींनी घेतला आहे. तसंच दोन्ही भागांची शूट एकत्रच होणार आहे. तसं बघायला गेलं तर सहसा मेकर्स पहिल्या भागाच्या रिलीजनंतरच दुसऱ्या भागाचं शूट सुरु करतात. पण कलाकारांच्या लूकमध्ये बदल व्हायला नको म्हणून 'रामायण'च्या दोन्ही भागांचं शूट लागोपाठच होणार आहे. यासाठी ३५० दिवसांचं शेड्यूल बनवण्यात आलं आहे. मु्ख्य शूटिंग पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत करण्यात येणार असल्याची योजना आहे. यानंतर पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु होईल.
सध्या 'रामायण' साठी रणबीर कपूर खूप मेहनत घेत आहे. त्याचे वर्कआऊटचे फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. शरीरयष्टीत त्याने कमालीचे बदल केले आहेत. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे. तर दुसरीकडे साईपल्लवीही सीतामातेच्या भूमिकेत शोभून दिसत आहे. सिनेमाच्या इतर स्टारकास्टबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सनी देओल हनुमान तर साऊथ अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.