नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये रणबीर कपूरसोबत सितेच्या भुमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 13:53 IST2023-10-04T13:49:32+5:302023-10-04T13:53:20+5:30
'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आगामी 'रामायण' सिनेमाची तयारी करत आहेत.

Ranbir Kapoor, Sai Pallavi in Nitesh Tiwari's Ramayan
'दंगल'चे दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या 'रामायण' चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट 'रामायण' च्या शुटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. कारण, या चित्रपटातील मुख्य पात्राची कास्टिंग पूर्ण झाली आहे. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात भगवान रामाची तर दक्षिण अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे.
आलिया भट्ट ही सीतेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. परंतु तारखा जुळत नसल्याने तिने चित्रपटातून माघार घेतली. आता निर्मात्यांनी साई पल्लवीला सीतेच्या पात्रासाठी निवडले आहे. नितेश तिवारी त्यांचा ड्रीम प्रोजक्ट 'रामायण' दोन भागात बनवणार आहेत. रणबीर कपूर आणि सई पल्लवी 2024 च्या सुरुवातीला 'रामायण' पार्ट 1 चे शूटिंग सुरू करणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
नुकतेच 'रामायण' वर आधारित 'आदिपुरुष' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये प्रभास आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत होते. मात्र, हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस पडला नाही. शिवाय, चित्रपटाला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत अनेकांनी नितीश तिवारी यांना ‘रामायण’ न बनवण्याचा सल्ला दिला. मात्र, चित्रपट निर्माते आपल्या निर्णयावर ठाम असून ते लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहेत.
दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल अशी चर्चा आहे. सध्या रणबीर कपूर आगामी 'अॅनिमल' सिनेमात दिसणार आहे. लवकरच सिनेमाचं प्रमोशन सुरु होईल. साई पल्लवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती आगामी 'SK 21' सिनेमात दिसणार आहे. शिवाय, तिने नुकताच नागा चैतन्यसोबत एक चित्रपट साइन केला आहे.