रणबीर कपूरचं ईडीला पत्र; मागितला दोन आठवड्यांचा वेळ, ६ ऑक्टोबरला बोलावलं होतं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 07:11 PM2023-10-05T19:11:01+5:302023-10-05T19:21:17+5:30
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने ईडीला मेल पाठवत दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरलाअंमलबजावणी संचालनालयाने (ED) महादेव ऑनलाईन लॉटरी प्रकरणात समन्स बजावले. ६ ऑक्टोबर रोजी रणबीरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आहेत. पण, रणबीर कपूरने ईडीला मेल पाठवत दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणास्तव हजर होण्याची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती त्यानं ईडीकडे केली आहे.
रणबीर कपूरला रायपूर येथील ईडी शाखेसमोर हजर व्हावे लागणार आहे. त्याला 4 ऑक्टोबरला ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. पण आता हजर होण्याच्या तारखेच्या एक दिवस आधी रणबीरने ईडीकडे आणखी दोन आठवड्यांचा वेळ मागितला.
महादेव ॲप कंपनीच्या एका उपकंपनीच्या ॲपचे प्रमोशन रणबीर यानं केलं होतं. त्यासाठी त्यानं रोखीनं मानधन स्वीकारल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. त्यासाठी रणबीरची चौकशी होणार आहे. ईडीच्या तपासानुसार रणबीर कपूर बेकायदेशीर बेटिंग ॲपचा प्रचार करत होता. ॲपची जाहिरात करणाऱ्या अनेक सोशल मीडिया जाहिरातींमध्येही त्यानं काम केलं आहे.
छत्तीसगडचे रहिवासी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल या दोघांनी महादेव बेटिंग ॲप लाँच केले. ईडीच्या म्हणण्यानुसार, “महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप हे एक मोठे सिंडिकेट आहे. जे बेकायदेशीर बेटिंग वेबसाइटसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नवीन युझर्सची नियुक्ती करण्यासाठी, युझर आयडी तयार करण्यासाठी आणि बेनामी बँक अकाऊंट्सच्या एका लेयर्ड वेबच्या माध्यमातून मनी लाँड्रिंगसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची व्यवस्था करते."
Actor Ranbir Kapoor summoned by Enforcement Directorate on 6th October, in connection with Mahadev betting app case
— ANI (@ANI) October 4, 2023
(file photo) pic.twitter.com/K8DZhME5RK
शिवाय, महादेव ऑनलाईन गेमिंग ॲप कंपनीच्या संस्थापकांपैकी एक सौरभ चंद्राकरच्या लग्नाचा भव्य सोहळा दुबईत पार पडला होता. या लग्नात बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावत परफॉर्म केले. या कंपनीसंदर्भात ईडीने छापेमारी केली असता लग्नाच्या इव्हेंटचीही ईडीने तपासणी केली. दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी ४१७ कोटी रुपये जप्त केले. या सोहळ्यात १४ बॉलिवूड कलाकार आले होते. टायगर श्रॉफ, रणबीर कपूर, सनी लियोनी, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली अजगर, विशाल ददलानी, नेहा कक्कड, भारती सिंह, भाग्यश्री, एली अवराम, पुलकित, क्रिती खरबंदा,कृष्णाभिषेक आणि नुसरत भरुचा यांचा समावेश आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारही ईडीच्या रडारवर आहेत.