'वीर सावरकर' सिनेमात अंकिताला घेण्यास रणदीप हुड्डाचा होता नकार; अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "मला पाहिल्यानंतर त्याने..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:44 PM2024-03-12T12:44:33+5:302024-03-12T12:45:57+5:30
अंकिता लोखंडे वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण, या सिनेमात अंकिता लोखंडेला घेण्यासाठी रणदीप हुड्डाचा नकार होता, असा खुलासा नुकताच अभिनेत्रीने केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित 'वीर सावरकर' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा या सिनेमात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'पवित्रा रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण, या सिनेमात अंकिता लोखंडेला घेण्यासाठी रणदीप हुड्डाचा नकार होता, असा खुलासा नुकताच अभिनेत्रीने केला आहे.
रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे सध्या 'वीर सावरकर' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या सिनेमात अंकिता लोखंडे वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. याबाबत अंकिताने भाष्य केलं. ती म्हणाली, "वीर सावरकर यांच्या पत्नी कोण आहेत, हे मला खरंच माहीत नव्हतं. मला सावरकरांबद्दल माहीत होतं. पण, एवढी सविस्तर माहिती नव्हती. जेव्हा मी रणदीपला भेटले तेव्हा त्याने मला सिनेमात घेण्यास नकार दिला होता. मला पाहिल्यानंतर तो म्हणाला, मला वाटत नाही मी तुला या सिनेमात घेईन. तेव्हा मी त्याला का? असं विचारलं. त्यावर त्याने मला या भूमिकेसाठी तू खूप pretty दिसशील, असं सांगितलं होतं. त्यावर माझी प्लीज असं म्हणून नकोस अशी प्रतिक्रिया होती."
"वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांच्याबद्दस रणदीपने एवढा रिसर्च केला होता की मला वेगळं काही करण्याची गरजच भासली नाही. एका यशस्वी पुरुषामागे उभ्या असलेल्या त्या एक यशस्वी स्त्री होत्या, " असंही अंकिताने सांगितलं.
'वीर सावरकर' या सिनेमाचं दिग्दर्शनही रणदीप हुड्डाने केलं आहे. हिंदीबरोबरच मराठी भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. नुकताच 'वीर सावरकर' सिनेमाचा मराठी भाषेतील ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या २२ मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.