सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; रणदीप हुडाने अज्ञात मारेकऱ्यांचे मानले आभार, म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:52 AM2024-04-15T10:52:07+5:302024-04-15T10:53:30+5:30
रणदीप हुडानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
भारताचा हेर असल्याच्या संशयावरून पाकिस्तानच्या तुरुंगात कैदेत ठेवण्यात आलेल्या सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज याची अज्ञातांकडून गळा चिरून हत्या केली. यावर अभिनेता रणदीप हुडानं प्रतिक्रिया दिली. अमीर सरफराज हत्येप्रकरणी त्यानं समाधान व्यक्त केलं. रणदीप हुडानं पोस्ट शेअर करत अज्ञात मारेकऱ्यांचे आभार मानले आहेत.
रणदीप हुडानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यानं लिहलं, कर्म...अज्ञात मारेकऱ्यांचे मी आभार मानतो. मला आज माझी बहीण दलबीर कौरची आठवण येते आहे. पूनम आणि स्वप्नदीप यांना माझं खूप प्रेम. सरबजीतला किमान इतका तरी न्याय मिळाला', अशी पोस्ट रणदीप हुड्डाने केली आहे.
KARMA
— Randeep Hooda (@RandeepHooda) April 14, 2024
Thank you ‘Unknown Men’ 🙏💪
Remembering my Sister Dalbir Kaur and sending love to Swapandeep and Poonam , today some justice to Martyr Sarabjit Singh has been served 🙏 https://t.co/CSn9WmevDv
२०१६ मध्ये सरबजीत सिंह यांच्यावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात आली होती. या बायोपिकमध्ये रणदीपने सरबजीत यांची भूमिका साकारली होती. तर, दलबीर कौर यांची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने केली होती. या चित्रपटात रणदीपचा अभिनय पाहून भारावून गेलेल्या दलबीर कौर यांनी खऱ्या आयुष्यातही रणदीपला आपलं भाऊ मानलं होतं. त्यामुळेच माझ्या मृत्यूनंतर मला खांदा दे असं वचन त्यांनी रणदीपकडे मागितलं होतं. विशेष म्हणजे दलबीर कौर यांचं जेव्हा निधन झालं. तेव्हा त्यांना खांदा देत रणदीपने ते वचन पूर्ण केलं.
सरबजीत सिंग हे भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावचे रहिवासी होते आणि याच गावात शेती करायचे. 30 ऑगस्ट 1990 रोजी ते नकळत पाकिस्तानच्या सीमेत पोहोचले. येथे त्यांना पाकिस्तानी लष्कराने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्यावर लाहोर आणि फैसलाबाद येथील बॉम्बस्फोटांचा आरोप टाकण्यात आला. 1991 मध्ये सरबजीत सिंग यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात सरबजीतच्या कुटुंबाने प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढली.
. 2008 मध्ये सरकारने सरबजीत सिंग यांच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली होती. यानंतर एप्रिल 2013 मध्ये पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात आमीर सरफराजने सरबजीतची हत्या पॉलिथीन बॅगने गळा आवळून केली होती. पाकिस्तानची दहशतवादी संघटना आयएसआयच्या इशाऱ्यावर सरफराजने सरबजीत यांना तडफडवून मारलं होतं. अखेर 2 मे 2013 रोजी उपचारादरम्यान सरबजीतचा मृत्यू झाला.