राणी मुखर्जीने फिल्म इंडस्ट्रीत पूर्ण केली 27 वर्षे; म्हणाली- '... तेव्हा वडील लहान मुलासारखं रडले होते'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 04:50 PM2023-10-19T16:50:57+5:302023-10-19T16:59:25+5:30
बॉलिवूडमध्ये 27 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राणीने आनंद व्यक्त केला. शिवाय, तिनं पहिल्या चित्रपटाशी संबंधित काही किस्सेही शेअर केले.
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, आवाजाने आणि आपल्या सौंदर्याने वर्षानुवर्षे चाहत्यांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री राणी मुखर्जीने हिंदी चित्रपटसृष्टीतील 27 वर्षे पूर्ण केली आहेत. राणीने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. गेल्या 27 वर्षांत तिनं आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडमध्ये 27 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राणीने आनंद व्यक्त केला. शिवाय, तिनं पहिल्या चित्रपटाशी संबंधित काही किस्सेही शेअर केले.
राणीने 1997 मध्ये आलेल्या 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना राणी मुखर्जी म्हणाली, '२७ वर्षे झाली असे वाटत नाही. या क्षणी जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा असे वाटते की जणू काही वर्षांपूर्वीच मी पदार्पण केलं होतं. 'राजा की आयेगी बारात' हा माझा पहिला चित्रपट आणि त्या चित्रपटातून मला जे काही शिकायला मिळाले, ते मी कधीही विसरणार नाही.'
पुढे ती म्हणाली, 'जर मी अभिनेत्री झाले नसते तर गेल्या 27 वर्षात प्रेक्षकांचे जे प्रेम मिळाले आहे. ते मला मिळालं नसतं. मी माझ्या स्वतःच्या पलीकडे एक कुटुंब तयार केलं आहे, जे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. चाहत्यांचं माझ्यावरील प्रेम मला अधिक कठोर परिश्रम करण्यास प्रेरित करतो'.
'राजा की आयेगी बारात' चित्रपटामध्ये काम करतानाच एक किस्साही तिनं शेअर केला. ती म्हणाली, 'माझ्या वडिलांची त्यावेळी खूप महत्त्वाची हृदय शस्त्रक्रिया झाली होती आणि मला आठवते की ते माझा पहिला चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले होते. माझ्या संवादांवर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि शिट्ट्या वाजवल्या. मला मिळालेलं प्रेम पाहून ते आनंदात लहान मुलासारखं रडल्याचं मला आठवतं. त्याचा उत्साह, त्याचा अभिमान आणि माझ्यावरील प्रेम हे शब्दात सांगू शकत नाही'.