प्रतीक्षा संपली! जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार राणी मुखर्जीचा 'मर्दानी 3'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:36 IST2024-12-13T12:34:09+5:302024-12-13T12:36:43+5:30
यशराज फिल्म्सने अधिकृतरीत्या 'मर्दानी 3' ची घोषणा केली आहे.

प्रतीक्षा संपली! जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार राणी मुखर्जीचा 'मर्दानी 3'
Rani Mukerji's Mardaani 3 : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाते. राणी मुखर्जीनं 2014 साली 'मर्दानी' या चित्रपटात पोलीस अधिकारी शिवानी रॉय ही भुमिका साकारली आणि आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना थक्क केलं. मर्दानीचा पहिला भाग 2014 मध्ये रिलीज झाला होता आणि त्याचा सीक्वल देखील 2019 मध्ये आला होता. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरले होते. आता 'मर्दानी 3' (Mardaani 3) बद्दल अपडेट आलं आहे.
यशराज फिल्म्सने अधिकृतरीत्या 'मर्दानी 3' ची घोषणा केली आहे. राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. राणी मुखर्जी म्हणाली, "मला अत्यंत आनंद होत आहे की, आम्ही 'मर्दानी 3' ची शूटिंग एप्रिल 2025 मध्ये सुरू करत आहोत. पोलीस युनिफॉर्म घालणे आणि एक असं पात्र साकारणे ज्याने मला नेहमीच प्रेम दिले, ही एक खास गोष्ट आहे. या साहसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेला पुन्हा न्याय देण्याचा मला अभिमान आह. ही फिल्म त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना समर्पित आहे, जे निस्वार्थपणे आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज मेहनत घेतात".
राणीने पुढे सांगितले की, "जेव्हा आम्ही 'मर्दानी 3' बनवण्याचा विचार केला, तेव्हा आमचा उद्देश असा होता की ही फिल्म प्रेक्षकांसाठी आधीपेक्षा वेगळा अनुभव घेऊन येईल. हा तिसरा भाग पाहून प्रेक्षक आनंदी होतील अशी आशा आहे. 'मर्दानी' ही खूपच आवडती फ्रेंचाइझी आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आमचं कर्तव्य आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. 'मर्दानी 3' हा डार्क, डेडली आणि ब्रूटल सिनेमा असणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाला किती प्रेम देतील, हे पाहायला मी उत्सुक आहे".
'द रेलवे मेन' फेम आयुष गुप्ता यांनी 'मर्दानी 3' चे पटकथा लेखन केले आहे. त्यांच्या प्रखर आणि प्रभावी लेखनशैलीला जागतिक स्तरावर खूप प्रशंसा मिळाली आहे. तर फिल्मचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला करणार आहेत. अभिराज यांनी आधी 'बँड बाजा बारात', 'गुंडे', 'सुलतान', 'जब तक है जान', 'टायगर 3' अशा अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सध्या ते 'वॉर 2' चे सहायक दिग्दर्शक आहेत आणि आता 'मर्दानी'फ्रेंचाइझीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.