बॉलिवूड अभिनेते रंजीत चौधरी यांचे निधन, रेखा-राकेश रोशनसोबत केले होते काम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:03 AM2020-04-16T10:03:04+5:302020-04-16T10:21:32+5:30
रंजीत चौधरी हे एक अभिनेते होतेच शिवाय लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख होती.
खट्टा मीठा, बातों बातों मे आणि खूबसूरत अशा अनेक चित्रपटात आपल्या छोट्याशा पण दमदार भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते रंजीत चौधरी यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. रंजीत चौधरी हे एक अभिनेते होतेच शिवाय लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख होती. दीर्घकाळापासून ते अमेरिकेत वास्तव्यास होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतल्याचे समजते.
सुमारे 40 सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करणा-या रंजीत यांना लोक विशेषत: ‘मिसीसिपी मसाला’ आणि ‘कामसूत्र’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांसाठी ओळखतात.
रंजीत यांची बहीण रैल पद्मसी हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या निधनाची बातमी शेअर केली. ‘रंजीत यांनी काल 15 एप्रिलला जगाचा निरोप घेतला. कालच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाऊन संपल्यानंतर 5 मे रोजी त्यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन केले जाईल,’ अशी माहिती रैलने आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.
रंजीत यांनी 1979 साली बासु चॅटर्जी यांच्या ‘खट्टा मीठा’ या सिनेमातून डेब्यू केला होता. यानंतर बासू चॅटर्जी यांच्याच बातों बातों में, खूबसूरत या सिनेमात ते झळकले. या सर्व चित्रपटात रंजीत कॉमिक रोलमध्ये दिसले होते.
‘खूबसूरत’ या सिनेमात रेखांसोबत रंजीत झळकले होते. राकेश रोशन यांच्या लहान भावाची भूमिका त्यांनी वठवली होती.
1980 साली रंजीत अमेरिकेला गेले. तिथे दीर्घकाळ ते एकटेच भटकले. याठिकाणी त्यांनी अनेक अमेरिकन शोमध्ये काम केले. स्टीव्ह कॅरेल व जैना फिशर यासारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले.
रंगभूमीवरही त्यांनी काम केले. पुढे ते लेखक म्हणून नावारूपास आलेत. त्यांनी लिहिलेल्या ‘सॅम अॅण्ड मी’ या कथेवर दीपा मेहता यांनी चित्रपट काढला होता. या चित्रपटात रंजीत यांनी अभिनयही केला होता. दीपा मेहता व रंजीत यांची मैत्री दीर्घकाळ टिकली. दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या ‘कांटे’ या सिनेमात त्यांनी एक छोटीशी पण यादगार भूमिका साकारली होती.