रानू दींचा दोनदा मोडला संसार! पहिल्या पतीने झिडकारले, दुस-यानेही अचानक सोडली साथ!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 10:28 AM2019-08-30T10:28:38+5:302019-08-30T10:43:52+5:30
रेल्वे स्टेशनव गाणी गात पोट भरणा-या रानू मंडल यांची कथा कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.
रेल्वे स्टेशनवर गाणी गात पोट भरणा-या रानू मंडल यांची कथा कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. लता मंगेशकरांनी गाणी गात स्टेशनवरच्या एका कोप-यात भीक मागणा-या रानू दींचा गातांनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि रानू एका रात्रीत स्टार झाल्यात. आता तर बॉलिवूडच्या पार्श्वगायिका म्हणून त्या ओळखल्या जात आहेत. पण या रानू दी कोण, कुठल्या हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. आता या रानूदीबद्दल एक नवा खुलासा झालाय. होय, हा खुलासा म्हणजे त्यांचा लग्नाबद्दलचा.
होय, रानूदींची दोन लग्न झाली होती. त्यांचा पहिला पती हा पश्चिम बंगालमध्येच राहणारा होता. वयाच्या 20 व्या वषार्पासून रानू क्लबमध्ये गात असत. त्याहीवेळी त्या कमालीच्या लोकप्रिय होत्या. पण त्याच्या पहिल्या पतीला ही गोष्ट खटकू लागली. वाद विकोपाला गेलेत आणि रानू दी यांनी एकेदिवशी पतीचे घर सोडले. पण यासोबतच त्यांचे गाणेही सुटले. पहिल्या पतीपासून रानू दी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. संसार मोडल्याने रानू दी कमालीच्या खचल्या आणि त्यांनी गाणे बंद केले. सन 2000 मध्ये याच अवस्थेत रानू दी मुंबईला आल्या.
मुंबईमध्ये एका अभिनेत्याच्या घरी त्यांनी काम स्वीकारले. हा अभिनेता कोण तर फिरोज खान. फिरोज यांच्या घरची पडेल ती काम त्या करत असत. याचदरम्यान रानू दी यांची ओळख बबलू मंडल यांच्याशी झाली. बबलू हे बंगलमधीलच होते. काही दिवसात या दोघांनीही लग्न केले. पण रानू दींचा हा दुसरा संसारही फार काळ टिकला नाही. 2003 मध्ये बबलू यांचे निधन झाले आणि रानू दी पुन्हा एकट्या पडल्या. यावेळी त्या आधीपेक्षाही खचल्या आणि बंगालमध्ये परतल्या.
पोट भरण्यासाठी कुठलेही साधन नसल्याने त्यांनी रेल्वे स्टेशनवरच ठाण मांडले आणि गाणी गात मिळेल त्या भिक्षेवर पोट भरू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून प्रत्येकजण त्यांच्याजवळ एक क्षण थबकत असे आणि कधी पैसे तर कधी खाण्याच्या वस्तू रानू दींच्या देत पुढे जाई. एकदिवस एतींद्र चक्रवर्ती नावाचा एक तरूण असाच रानू दींच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाला. त्याने रानू दींचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. पुढे या व्हिडीओने रानू दींचे अख्खे आयुष्य बदलले, हे तुम्हाला ठाऊक आहेच.