रणवीर सिंगने या कारणामुळे 'जयेशभाई जोरदार'मध्ये काम करण्यास दिला होकार; कपिलच्या शोमध्ये केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 05:59 PM2022-05-06T17:59:43+5:302022-05-06T18:00:10+5:30
Ranveer Singh: अभिनेता रणवीर सिंगने नुकतेच कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याचा आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'चे प्रमोशन केले.
अगदी पहिल्या चित्रपटापासून रणवीर सिंग(Ranveer Singh)ने बॉक्स ऑफिसवर पैसा वसूल चिटपट देऊन आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता हा अष्टपैलू अभिनेता ‘जयेशभाई जोरदार’ (Jayeshbhai Jordar) या विनोदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्याने सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show)मध्ये हजेरी लावली आणि त्यावेळी त्याच्यासोबत त्याची सह-कलाकार शालिनी पांडे(Shalini Pandey)देखील होती. आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना रणवीर सिंगने सांगितले की, दिल्लीची संस्कृती जवळून बघण्यासाठी तो दिल्ली युनिव्हार्सिटीच्या आसपास फिरायचा. या अभ्यासातूनच त्याने बिट्टू शर्मा ही भूमिका साकारली, जी प्रेक्षकांना खूप भावली.
रणवीर सिंग म्हणतो, “मी बॅंड बाजा बारातसाठी ऑडिशन दिली होती. त्यावेळी मला सांगण्यात आले होते की, ही भूमिका दिल्लीत राहणार्या एका २१ वर्षीय मुलाची आहे. त्यामुळे त्या सुमारास प्रदर्शित झालेले दिबाकर बॅनर्जीच्या ‘ओय लकी लकी ओय!’ सारखे दिल्लीची पार्श्वभूमी असलेले चित्रपट पाहून मी स्वतःच्या शब्दोच्चाराच्या ढंगावर अभ्यास केला. माझा जन्म आणि संगोपन मुंबईत झाले आहे यावर आदित्य (चोप्रा) सरांचा तर विश्वासच बसेना! थोडक्यात सांगायचे तर ऑडिशन फेरीत मी त्यांच्यावर चांगली छाप पाडली होती. त्यानंतर, दिल्लीची संस्कृती आत्मसात करण्यासाठी मनीष शर्मा (दिग्दर्शक) यांनी मला त्यांच्याबरोबर लोकेशन रेकीसाठी यायला सांगितले. त्यावेळी माझे काम लोकांचे निरीक्षण करण्याचेच असे. त्यांनी मला ती संस्कृती जाणून घ्यायला सांगितले, कारण बिट्टूची व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी मला त्याचा उपयोग होणार होता.”
आपल्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाविषयी तो म्हणाला, या पटकथेचे वैशिष्ट्य म्हणजे मी अशी गोष्ट यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. मला जेव्हा या चित्रपटाचे कथानक सांगण्यात आले, तेव्हा मी एकाच वेळी रडत आणि हसत होतो. अशा भावना जागृत करणारे चित्रपट निराळेच असतात. दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट असला तरी, माझ्यासाठीही असे कथानक पहिल्यांदाच मिळालेले होते. मी त्याच क्षणी चित्रपटासाठी होकार देऊन टाकला. मी म्हटले, मला हा चित्रपट केलाच पाहिजे!